लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २०२०-२१ मधील गळीत हंगामाच्या थकीत बिलातील पैसे देण्यासाठी कारखान्याच्या संचालक मंडळाने पुणे येथील साखर आयुक्तांची परवानगी मिळवून २५ एकर जमीन विकली होती. याबाबत माजी मंत्री, आमदार प्रकाश सोळंके यांनी सहकार विभागाकडे तक्रार केली होती. दरम्यान, सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी या जमीन विक्रीला स्थगिती दिली आहे.
जमीन विक्रीप्रकरणी शेतकरी, सभासद शेतकऱ्यांनी आणि शेतकरी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष कालीदास आपेट यांनी पुढाकार घेऊन या आदेशास विरोध करून आंदोलन पुकारले होते. ७ सप्टेंबर रोजी सोळंके यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे एक लेखी तक्रार दाखल केली होती. जमीन विक्रीच्या सर्व व्यवहाराला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी तक्रारीद्वारे केली होती.
...
काय होती तक्रार...
अंबाजोगाई सहकारी साखर कारखानाचे अध्यक्ष रमेश आडसकर व संचालक मंडळाच्या गैरकारभारामुळे कारखाना १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त तोट्यात आहे. कारखान्यातील कामगारांचे सुमारे २० कोटी रुपयांचे वेतन थकीत आहे. ऊसतोडणी यंत्रणा व वाहतूक ठेकेदारांचेसुद्धा कोट्यवधीचे देणे थकीत आहे. शेतकऱ्यांची बाकी थकीत असल्यामुळे कारखान्याने सर्व्हे नं. ४०/२ मधील २४.०० हेक्टर आर. जमिनीपैकी २५ एकर जमीन विक्रीचा प्रस्ताव तयार करून साखर आयुक्तांना दिला होता. चुकीच्या पद्धतीने जमीन विक्री करण्यास आयुक्तांनी परवानगी दिली. कारखान्याच्या जमिनीचे बाजार मूल्य एकरी १ कोटीच्यावर असतानासुद्धा बोगस मूल्यांकन रिपोर्ट तयार करून कोट्यवधी रुपयांची जमीन अतिशय कमी किमतीमध्ये विक्री केली आहे. त्यामुळे कारखान्याचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे, असेही सोळंके यांनी तक्रारीत म्हटले आहे.
....
अंबाजोगाई कारखाना दोन वेळा दिवाळखोरीत निघाला. २००६ पासून आम्ही बँकेचे कर्ज फेडले. राज्यातील सर्वच साखर कारखाने अडचणीत आहेत. अनेकांनी बँकेचे कर्ज देण्यासाठी कारखाने विक्रीस काढले. आम्हाला कोणत्याही बँकेने पैसे मागितले तरी दिले नाहीत. शेतकरी, कामगारांची कामधेनू चालावी या सामाजिक बांधीलकीतून आम्ही कारखाना चालविला आहे. शेतकरी, कामगारांचे संसार चालावेत, यासाठी जमीन विक्रीची परवानगी मागितली. त्यास कायदेशीर मान्यता मिळवून जमीन विक्री करून एफआरपीप्रमाणे देणे दिले. याकडे सर्वांनी सकारात्मक दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. त्याचे राजकीय भांडवल करू नये.
-रमेश आडसकर, अध्यक्ष, अंबाजोगाई साखर कारखाना.