- नितीन कांबळे
कडा : जीवन एकदाच मिळते, त्यामुळे आयुष्य जगताना सर्व गोष्टींचा आनंद घ्यायला हवा. यामधून सामाजिक कार्याव्यतिरिक्त दुसरे चांगले क्षेत्र नाही असा माझा अनुभव आहे. मी ओघाने राजकारणात आले होते मात्र आता केवळ समाजकारण करणार असल्याचे प्रसिद्ध सिनेअभिनेत्री दीपाली सय्यद यांनी स्पष्ट केले.
आष्टी येथील भगवान विद्यालयातील एका कार्यक्रमाप्रसंगी दिपाली सय्यद शहरात आल्या आहेत. यावेळी लोकमत प्रतिनिधीने त्यांच्यासोबत संवाद साधला.त्या पुढे म्हणाल्या की, मी वयाच्या तिसऱ्या वर्षापासून अनेक छंद जोपासले आहेत. नृत्यामध्ये पीएचडी मिळवली,अनेक चित्रपट, मालिकांमध्ये अभिनय केला. दरम्यान, इच्छा नसतानाही केवळ लोकांच्या प्रेमापोटी मी राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर दोन तीन वेळा निवडणूक लढवली. यातून निवडणूक काय असते आणि ती कशी लढवतात हे अनुभवता आले. दरम्यान, अनेक क्षेत्रातील अनुभवानंतर सामाजिक कार्यात मला अधिक आनंद मिळतो. या माध्यमातून सामान्य, वंचित घटकातपर्यंत जाता येते, त्यांच्या वेदना समजून घेता येतात. त्यामुळे यापुढे राजकारण नाही तर केवळ समाजकारणात पुढील आयुष्य व्यतीत करणार आहे असेही त्या यावेळी म्हणाल्या.