लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : एकीकडे कोरोनाने थैमान घातल्याने मागील वर्षभरात हजारो लोकांचा मृत्यू झाला. मृत्यू रोखण्यात अपयश आलेल्या आरोग्य विभागाने मृत्यूची नोंदही पोर्टलवर केली नसल्याचे उघड झाले होते. आता हाच मुद्दा धरून आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांना उशिराने जाग आली असून, कोरोना बळींची पोर्टलवर नोंद करा म्हणून त्यांनी राज्यातील सर्वच जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना आदेश दिले आहेत. यासाठी १० जूनपर्यंत मुदत दिली आहे.
महाराष्ट्रात सर्वत्रच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जीवित हानी मोठ्या प्रमाणात झाली. सुविधा, उपचारातील दुर्लक्ष यामुळे अनेकांचा जीव गेल्याच्या तक्रारी होत्या. रोज शेकडो मृत्यू हाेत होते. परंतु, या मृत्यूची नोंदच संबंधित शासकीय व खासगी संस्था आयसीएमआर पोर्टलवर नोंद करीत नव्हत्या. ही बाब 'लोकमत'ने बीडमध्ये ९ मे रोजी उघड केली होती. त्यानंतर बीड प्रशासनाने दखल घेत जुने मृत्यू पोर्टलवर नोंदविले. परंतु, बीडसारखेच प्रकार राज्यात सर्वत्र झाल्याचा संशय होता. यावर शासनाने तत्काळ दखल घेऊन मृत्यू अपडेट करून त्यांचे ऑडिट आणि त्यावर उपाययोजना करणे आवश्यक होते. परंतु, तब्बल महिन्यानंतर प्रधान सचिवांना जाग आली आहे. मंगळवारी सचिवांना सोशल मीडियावरून राज्यातील सर्वच जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना कोरोना बळी पोर्टलवर नोंद करण्याबाबत सूचना केल्या आहेत. यासाठी त्यांना १० जूनपर्यंत मुदतही दिली आहे. आता यात किती जिल्हे प्रामाणिक नोंद करतात, हे अंतिम अहवाल आल्यानंतरच समजणार आहे. याबाबत प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क केला. परंतु, त्यांनी फोन कट केल्याने त्यांची बाजू समजली नाही.
....
बीडमध्ये आकडे जुळविताना यंत्रणेची धावपळ
'लोकमत'ने वृत्त प्रकाशित करताच बीड आरोग्य विभाग खडबडून जागा झाला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी पाच सदस्यांची समिती नियुक्त करीत यंत्रणा कामाला लावली. पहिल्या दहा दिवसांत तब्बल २०४ जुन्या मृत्यूची नोंद पोर्टलवर झाली होती. आणखीही नोंद करणे सुरूच असून, दोन दिवसांत अहवाल तयार होईल, असे डाॅ. पवार म्हणाले.