फोटो : 08बीईडीपी१३ - आयसीएमआरच्या पथकाकडून नागरिकांची तपासणी करतानाचे छायाचित्र.
स्पॉट रिपोर्ट - मु.पो.आर्वी ता.शिरूर
बीड : राज्यासह देशात क्षयरोगाचे प्रमाण किती आहे, हे शोधण्यासाठी आयसीएमआरकडून सर्वेक्षण केले जात आहे. महाराष्ट्रात यासाठी ५७ ठिकाणांची निवड केली आहे. तब्बल ५५ वर्षांनंतर असे सर्वेक्षण केले जात आहे. बीडमधील शिरूर तालुक्याच्या आर्वी गावात हे सर्वेक्षण सुरू असून, १५ वर्षांपुढील व्यक्तिंची तपासणी केली जात आहे. यात नाव, वजन, उंची मोजून थुंकीचा नमुना घेतला जात आहे. याच्या अहवालावरूनच भविष्यात उपाययोजना केल्या जाणार आहेत.
राज्यात साधारण १९६५ साली असे सर्वेक्षण झाले होते. आता आयसीएमआरने गतवर्षीपासून या संशोधनास सुरुवात केली. यासाठी राज्यातील ५७ ठिकाणांची निवड केली. या सर्वेक्षणाला सुरूवात झाली आणि लगेच कोरोना आला. त्यामुळे हे सर्वेक्षण थांबवून कोरोनाचे सर्वेक्षण झाले. आता कोरोनाचे तीनही टप्पे पूर्ण झाल्याने पुन्हा या सर्वेक्षणाला सुरूवात झाली आहे. बीडच्या शिरूर तालुक्यातील आर्वी गावात हे सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. यासाठी राष्ट्रीय स्तरावरूनच एक नकाशा दिला असून, त्याद्वारे १५ वर्षांपुढील व्यक्तिंची तपासणी केली जात आहे. एका ठिकाणी किमान ८०० लोकांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट या पथकाला देण्यात आलेले आहे. सात ते आठ दिवस एका गावात सर्वेक्षण केले जाणार आहे.
कसे होते सर्वेक्षण आणि तपासणी?
नकाशाप्रमाणे घरी भेट दिली जाते. १५ वर्षांपुढील व्यक्तिची नोंद घेऊन त्यांना कार्ड दिले जाते. ते कार्ड शिबिराच्या ठिकाणी दाखवून नोंद घेतली जाते. त्यानंतर वजन, उंची मोजून मधुमेह, रक्तदाब किंवा इतर आजार आहेत का, याची विचारणा करून मुलाखत घेतली जाते. तेथून थुंकी तपासणी करून एक्स रे काढला जातो. यात क्षयरोगाची लक्षणे दिसताच संबंधिताची निक्षय ॲपमध्ये नोंद घेतली जाते. त्यानंतर याच व्यक्तिची थुंकी तपासणीसाठी पुण्याच्या आयआरएल प्रयोगशाळेत पाठविली जात आहे. क्षयरोग निष्पन्न झालेल्यांवर तत्काळ उपचारही करण्यास सुरूवात केली जात आहे.
बीडमध्ये ही टीम २४ तास सोबत
आयसीएमआरच्या पथकासोबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी, वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल मुळे, जिल्हा कार्यक्रम समन्वयक विजय कारगुडे, सीएचओ संतोष आरेकर, एएनएम, आशाताई, अंगणवाडी सेविका या पथकांसोबत २४ तास सोबत असतात. शांतीवनचे संचालक दीपक नागरगाेजे यांच्याकडूनही या पथकाला सहकार्य केले जात आहे.
राज्यात ३ पथकांत ६९ कर्मचारी
राज्यात हे सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी ३ पथके आहेत. एका पथकात किमान २३ अधिकरी, कर्मचारी आहेत. यात वैद्यकीय अधिकारी, तंत्रज्ञ, परिचारिका आदींचा समावेश आहे. डॉ. ऋषिकेश आंधळकर हे पथक प्रमुख आहेत. या पथकासोबत सोयी सुविधा व यंत्र असलेली स्वतंत्र गाडीदेखील आहे.
कोट
आर्वी गावात आयसीएमआरच्या पथकाकडून क्षयरोग संशोधनाबाबत सर्वेक्षण सुरू आहे. याला भेट दिली असून, सर्व यंत्रणा त्यांना सहकार्य करीत आहे. नागरिकांची तपासणी करून सॅम्पल घेतले जात आहेत. जे बाधित आढळतात, त्यांची निक्षय ॲपवर नोंद करून उपचार केले जात आहे.
डॉ. आर. बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड