बीड: भाजपा नेत्या आमदार पंकजा मुंडे यांच्या दरवर्षी सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावरील यंदा प्रथम भाऊ धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहे. याबाबत स्वतः धनंजय मुंडे यांनी सोशल मीडिया साईट 'एक्स'वर याची माहिती देत, 'चलो भगवान भक्तीगड!' चा नारा दिला आहे.
राज्यात दसरा मेळाव्याची मोठी परंपरा आहे. यातील गोपीनाथ मुंडे यांच्या भगवान गडावरील मेळाव्याकडे राज्यभराचे लक्ष वेधले जाई. त्यांच्यानंतर आ. पंकजा मुंडे यांनी सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर दसरा मेळावा सुरू केला. यात पंकजा यांच्यासोबत त्यांच्या दोन्ही बहिणी आणि राज्यातील अनेक ओबीसी नेते उपस्थिती लावत. मात्र, राज्यातील बदलत्या समिकरणात भाजपा आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी सत्तेत सोबत आली आहे. लोकसभेसाठी महायुतीकडून पंकजा मुंडे यांना बीडमधून तिकीट मिळाल्यानंतर भाऊ धनंजय मुंडे यांनी सारी सूत्र हाती घेत निकराने प्रचार केला. लोकसभेत पकंजा यांचा पराभव झाला मात्र यावेळी मुंडे कुटुंब अनेक वर्षांनी एकत्र आल्याचे चित्र दिसले. यामुळेच कुटुंबातील हेच ऐक्य दसरा मेळाव्यात देखील दिसेल का याची उत्सुकता होती.
दरम्यान, राष्ट्रसंत भगवानबाबा यांचे जन्मगाव असलेल्या सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे यांचा मेळावा १२ ऑक्टोबर रोजी होत आहे. यासाठी राज्याचे नेते कोण येणार? हे अद्याप सांगितलेले नाही; परंतु जिल्ह्यात अजित पवार गटाचे धनंजय मुंडे व भाजप नेत्या पंकजा मुंडे या बहीण-भावाची जास्त चर्चा असते. आता हे दोघेही महायुतीत आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे हे मेळाव्याला जाणार का? असा प्रश्न आहे. याचे उत्तर आता स्वतः धनंजय मुंडे यांनी दिले असून, चलो भगवान भक्तीगड...! असा नारा त्यांनी दिला आहे. सोशल मिडियातील संदेशात मुंडे म्हणाले,''आपला दसरा, आपली परंपरा...! ही परंपरा जोपासत आपल्याशी संवाद साधून विचारांचे सोने लुटायला या वर्षी प्रथमच मीही येतोय, भगवान भक्तीगडावर सावरगाव घाट येथे. या विजयादशमीला संत भगवानबाबांचे आशीर्वाद घ्यायला मी येतोय, तुम्हीही या...!''
राज्यातील बदलते सामाजिक, राजकीय वातावरणश्रीक्षेत्र नारायणगडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांचाही १२ ऑक्टोबरलाच दसरा मेळावा होत आहे. या ठिकाणी लाखो समाजबांधव येतील, असा दावा केला आहे. जरांगे यांनी सातत्याने ओबीसीमधून मराठा आरक्षण देण्याची मागणी लावून धरली आहे. राज्यभरात यामुळे ओबीसी विरुद्ध मराठा असे चित्र उभे राहून याचा फटका लोकसभा निवडणुकीत अनेक उमेदवारांना बसला. आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रथमच जरांगे यांचा दसरा मेळावा होत आहे. हा मेळावा केवळ मराठ्यांचा नसून सर्वांचा आहे असे जरांगे यांनी जाहीर केले असले तरी या मेळाव्याच्या माध्यमातून ते कोणती भूमिका मांडतात याकडेही लक्ष आहे. यासोबतच मुंडे भाऊ- बहीण राज्यातील बदलत्या राजकीय आणि सामाजिक वातावरणात कोणती भूमिका मेळाव्यातून मांडतात याकडे देखील सर्वांचे लक्ष असणार आहे.