लोकमत न्यूज नेटवर्कबीड : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..’ असा जयघोष करीत दहा दिवस मुक्कामी असलेल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. यावर्षी न्यायालयाची बंदी असल्यामुळे गणेशभक्तांनी डीजे, डॉल्बीला फाटा देत पारंपरिक वाद्याचा वापर करून बाप्पाच्या मूर्तीचे जल्लोषपूर्ण वातावरणात आणि शांततेत विसर्जन केले. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून तगडा बंदोबस्त तर भक्तांना अडचण येणार नाही, त्रास होणार नाही, यासाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले होते.१३ सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाचे आगमन झाले होते. दहा दिवस गणेश भक्तांनी बाप्पांची मनोभावे पुजा केली. विविध सामाजिक उपक्रम राबविले. मनोरंजन, पथनाट्य, सांस्कृतिक, देखाव्यांमधून जनजागृती केली. यामुळे यावर्षीचा गणेशोत्सव आदर्श ठरला. विशेष म्हणजे नियमांचे पालन करून गणेशोत्सव आदर्श बनविणाऱ्या गणेशमंडळांना पालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने बक्षिसेही जाहीर करण्यात आली. त्यामुळे मंडळे जोमाने कामाल लागले होते.दरम्यान, रविवारी सकाळपासूनच गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली. दुपारपर्यंत बाल गणेश मंडळांनी हातगाडा, रिक्षा, ट्रॅक्टरमधून बाप्पांची मिरवणूक काढली. ढोल, ताशा आणि हलगीच्या तालावर ठेका धरत गुलालाची उधळण करून बाप्पांचा जयघोष करीत मूर्तीचे विसर्जन केले. दुपारनंतर मोठ्या मंडळांनी मिरवणुकीला सुरूवात केली. रात्री उशिरापर्यंत या मिरवणुका चालल्या.माजलगावात सकाळपासूनच मिरवणुकांना सुरुवातलोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : शहरासह तालुक्यात सकाळी १० वाजेपासूनच मिरवणुकांना सुरूवात झाली. शहरातील शाळा, कॉलेज, संस्थामधील गणेश विसर्जन मिरवणूक १२ वाजता सुरु झाल्या.शहरातील नामांकित आनंद गणेश, नवतरुण, मोंढा गणेश, क्रांती गणेश, जय महाराष्ट्र, कोष्टी गणेश मंडळ, छत्रपती, जयहिंद, राजस्थानी, शिवाजी, मराठवाडा, भोईराज, तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्य आदी गणेश मंडळाच्या मिरवणुकीस सायंकाळी सुरुवात झाली.या विविध झांकी, लहान मुलींचे टिप-या, डान्स, लेझीम, मशाल डान्स आदींसह मराठी गाण्यावर मिरवणुकीत तरुणाई थिरकताना दिसली. ठाणे येथील मोंढा गणेश मंडळाचे ढोलताशा पथक, आनंद गणेश मंडळाच्या मुलींच्या टिपºया व महिलांनी सोनूच्या गाण्यातून डीजेमुक्त होण्याचा संदेश दिला. कोष्टी गणेश मंडळाच्या देखाव्यात दुचाकीस्वारांना दिलेला हेल्मेटचा वापर करा म्हणणारा बाप्पाने दिलेला संदेश सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. संपूर्ण मिरवणूक मार्ग व नदीपात्रात पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.अंबाजोगाईत पोलिसांचे ढिसाळ नियोजनलोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : अंबाजोगाईत २३ गणेश मंडळांच्या विसर्जनाच्या मिरवणुका शहरातून निघाल्या होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते शिवाजी चौक या दीड कि.मी. च्या अंतरावर सर्वच मिरवणुका असतात. हे अंतर पार करण्यासाठी गणेश मंडळांना रात्री १२ पर्यंत सहा ते सात तासाचा कालावधी आवश्यक असतांना मिरवणुका दहा तास चालल्या.दुपारी दोन वाजल्यापासून गणेश मंडळांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात प्रस्थान केले. रात्री बारा वाजेपर्यंत मिरवणुका सुरू होत्या. समोरची गर्दी कमी होईना यामुळे अनेक गणेश मंडळांनी आहे तिथूनच मार्ग बदलून गणपतीचे विसर्जन केले तर रात्री आठ वाजता मिरवणुकीच्या मार्गावरील सावरकर चौक बसस्थानक परिसरात अचानक विद्युतप्रवाह खंडित झाल्याने गणेश भक्तांना अंधारात चाचपडण्याची वेळ आली. तब्बल एक तासानंतर हा वीजप्रवाह सुरू झाला.गणेश उत्सवाच्या निघालेल्या मिरवणुकीत ज्ञानप्रबोधिनी, दीपक गणेश मंडळ, हनुमान सांस्कृतिक गणेश मंडळ, तरूण गणेश मंडळ, नवयुवक गणेश मंडळ, महाराष्ट्र सांस्कृतिक गणेश मंडळ व विविध गणेश मंडळांनी शहरातून टोलेजंग मिरवणुका काढल्या. ढोलताशांचा गजर, लेझीम पथक, मुलींचे ढोलपथक, टेंभा लेझीम ही प्रमुख आकर्षणे राहिली. रात्री १२ वाजेपर्यंत भाविकांची मोठी गर्दी होती. पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले.परळीमध्ये विविध देखाव्यांनी वेधले लक्षलोकमत न्यूज नेटवर्कपरळी : परळीच्या वैद्यनाथ मंदिर जवळील हरिहर तीर्थात गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन, मिरवणुकीत धार्मिक देखावे, मोबाइलचे लागलेले वेड यावर देखावे होते. राजस्थानी गणेश मंडळाचे तीन देखावे होते. तसेच पद्मावती गल्ली, उखळवेस गणेश मंडळाने ही देखावा सादर केला. राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात हे देखावे पाहण्यासाठी रात्री ९ नंतर गर्दी झाली.विविध गणेश मंडळ पदाधिकाºयांचे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या वतीने स्वागत केले. उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश गायकवाड, पोलीस निरीक्षक देविदास शेळके, उमाकांत कस्तुरे, उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, तहसीलदार शरद झाडके, नप मुख्यधिकारी अरविंद मुंडे उपस्थित होते. वैजनाथ देवस्थान ट्रस्ट व श्री वैजनाथाचा राजा सार्वजनिक गणेश मंडळाच्या श्रीं चे विसर्जन मुख्य मार्गदर्शक राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ९ वाजता विधीवत पूजा करून सवाद्य मिरवणूक काढून हरिहर तीर्थ येथे करण्यात आले. मिरवणुकीमध्ये मंडळाचे अध्यक्ष नितीन राजूरकर, उपाध्यक्ष सुरेश टाक, सचिव राजेश्वर तिळकरी, कोषाध्यक्ष पिंटू स्वामी, पिंटू बुद्रे, शिरीष स्वामी, उत्तम चव्हाण, राघू स्वामी, भीमा स्वामी, बाळू जोशी पुरोहित, राजाभाऊ जोशी, राजेश चव्हाण इतर पदाधिकारी व वैजनाथ देवस्थान विश्वस्त सहभागी होते.आष्टीत १६० मूर्तींचे विसर्जनलोकमत न्यूज नेटवर्कआष्टी / कडा : आष्टी, अंभोरा, पोलीस ठाणे अंतर्गत व कडा पोलीस चौकीच्या अंतर्गत बसलेल्या १६० गणेशाचे विसर्जन रविवारी रात्री शांततेत विसर्जन करण्यात आले.यंदाच्या वर्षी अपुºया पावसामुळे गणेशभक्तांना गणेशाचे विसर्जन दुष्काळी सावटाखाली करावे लागले. एरवी नदी, नाले, विहिरी तुडुंब असल्याने हवे तिथे विसर्जन करता यायचे. मात्र, यावर्षी पाणी कुठे आहे ते सापडत विसर्जन करण्याची वेळ आली होती. या काळात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.धारूरमध्ये १० तास चालल्या मिरवणुकालोकमत न्यूज नेटवर्कधारूर : शहरात ढोल ताशाच्या गजरात विविध प्रात्यक्षिकांसह गणरायाला निरोप देण्यात आला. नऊ ते दहा तास या मिरवणुका चालल्या. नगरपालिकेसमोरील तलावात मूर्तीेचे विसर्जन करण्यात आले. शहरात १७ मंडळांनी श्री गणरायाची स्थापना केली होती. शहरातील पाच गणेश मंडळांनी शनिवारी, तर दहा ते बारा मंडळानी मोठ्या थाटात मिरवणूक काढत मूर्तीचे रविवारी विसर्जन केले. ढोल-ताशाचा गजर व लेझीम टिपरीचे विविध प्रात्यक्षिकासह मिरवणूक काढण्यात आली. व्यापारी वर्गातर्फे विविध ठिकाणी फराळाची व्यवस्था केली. मिरवणुक शांततेत झाली.
पुढच्या वर्षी लवकर या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 1:17 AM