अंबाजोगाई : बीड-लातुर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यातील १७२ गावाची तहान भागवणा-या मांजरा धरणात आज १४ ॲाक्टोबर रोजी सकाळपर्यंत ७६ टक्यांच्याही पुढे पाणी संचय झाला. धरणक्षेत्रात पाण्याचा ऐवा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे याही वर्षी धरण पुर्णक्षमतेने भरेल आणि धरणाची दरवाजे उघडण्याची वेळ प्रशासनावर येईल अशी आशा निर्माण झाली आहे.
यावर्षी जुन महिन्यापासूनच दमदार पावसास सुरुवात झाली असल्यामुळे मराठवाड्यात सर्वच मोठी धरणे ओसांडुन वाहत आहेत. मांजरा धरणाच्या वरच्या बाजुस नदीच्या उगमस्थानापासुन १४ बंधारे आणि लहान मोठे असे २६ तलाव निर्माण करण्यात आल्यामुळे अलिकडील कांही वर्षात मांजरा धरण भरण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशाही परिस्थितीत ‘मांजरा’ तग धरुन उभे राहण्याचा प्रयत्न करतेयच! अलिकडे पर्जन्यमानात झालेली कमी आणि मोठ्या पुढा-यांची पाणी ओढण्यासाठी निर्माण झालेली जीवघेणी स्पर्धा बीड-लातुर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील १७२ गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या या गावातील माणसांची, जनावरांची, पक्षांची, पिकांची तहान भागवणा-या मांजरचा गळा घोटण्याचा प्रयत्न करीत आहेत. आणि या १७२ गावातील लोकप्रतिनिधी, छोटे-मोठे पुढारी, सामाजिक कार्यकर्ते हा सर्व प्रयत्न अतिशय थंड डोक्याने पहात आहेत.
यासर्व अडचणींचा मुकाबला करीत मांजरा नदी आणि धरण आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. यासर्व अडथळ्यांच्या स्पर्धेमुळे आता मांजरा भरण्यास विलंब लागत आहे. आज १४ आँक्टोबर रोजी मांजरा धरणात ७६ टक्यापेक्षा ही जास्त पाणी साठा जमा झाला आहे. सध्या बेडुक नक्षत्र सुरु आहे. या नक्षत्रात चांगला पावूस पडतो असे संकेत आहेत. शिवाय कमी दाबाचा निर्माण झालेल्या पट्ट्यामुळे आपल्या भागात या चार दिवसांत सांगितलेल्या मोठ्या पावसाचा आपल्याला लाभ होणार अशी चिन्हे अधिक आहेत. याशिवाय नेहमी तारणारा परतीचा पावूस ही अजून शिल्लक आहेच. या सर्व बाबींचा सकारात्मक विचार केला तर काही दिवसांत मांजरा धरण भरल्याची व धरणाचे दरवाजे उघडल्याची गोड बातमी आपणास ऐकायला मिळेल अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.
धरणात १७१.१८३ दलघमी पाणीसाठा मांजरा धरणाची संपुर्ण पाणी साठवण क्षमता २२४.०८३ दलघमी एवढी असून आज धरणात १७१.१८३ दलघमी पाणी साठा जमा झाला आहे. म्हणजे धरण पुर्णक्षमतेने भरण्यासाठी ५४ दलघमी पाणी साठ्याची आवश्यकता आहे. आज मांजरा नदीचा प्रवाह लक्षात घेतला तर प्रति सेकंदास ४.९१८ घ.मी. एवढे पाणी धरणक्षेत्रात जमा होत आहे. धरणक्षेत्राच्या कँचमेंट एरीयात आणखी जोराचा पावूस झाला तरहे प्रमाण वाढु ही शकेल. मांजरा नदीची क्षमता प्रति सेकंदास १६६.४४२ घनमीटर एवढे पाणी धरणात आणण्याची आहे. धरण भरण्यासाठी कसली प्रकारची अडचण येईल, असे वाटत नाही.