बीड : जिल्हा रुग्णालयात कोरोनामुळे मागील अनेक महिन्यांपासून शस्त्रक्रिया बंद होत्या. सोमवारी सकाळी जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. सुरेश साबळे यांनी आढावा घेऊन शस्त्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना केल्या. सोमवारी याला सुरुवातही झाल्याचे सांगण्यात आले. यामुळे सामान्यांना दिलासा मिळाला आहे.
जिल्हा रुग्णालयात हार्निया, ॲपेंडेक्स, गजकरण, गाठ, हाडांच्या संदर्भातील शस्त्रक्रिया केल्या जात होत्या. परंतु, चालू वर्षात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने या सर्व शस्त्रक्रिया बंद पडल्या होत्या. तसेच मध्यंतरी अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. परंतु, जिल्हा शल्य चिकित्सक पदाचा कारभार हाती घेताच डॉ. सुरेश साबळे यांनी यंत्रणा कामाला लावली. प्रसुती, मेडिसीन, लॅब आदी संदर्भातील सर्व सुविधा देण्यासह शस्त्रक्रिया करण्याच्या सूचना केल्या. सर्जन डॉ. माजीद यांना रुग्णास परत न पाठविता शस्त्रक्रिया करण्यास सांगताच एका रुग्णाची तत्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. आता यापुढे नियमित छोट्या व मोठ्या शस्त्रक्रिया हळूहळू सुरू केल्या जाणार असल्याने सामान्यांना दिलासा मिळाला आहे.
आरोग्य संस्था प्रमुखांशी आढावा बैठक
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी सोमवारी दुपारी कोविड रुग्णसेवेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था प्रमुखांची जिल्हा रुग्णालयात बैठक घेतली. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी मार्गदर्शन केले. बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांनी कोरोना चाचण्या वाढवण्यावर भर देण्याबाबत तसेच, नॉन कोविड रुग्णालयातील आरोग्य सुविधा सुरळीत करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
---
ओपीडीतील रुग्णसंख्या वाढविण्यासह शस्त्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. याला सोमवारपासून सुरुवातही झाली आहे. सरकारी रुग्णालयाबद्दल विश्वास निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरूच आहेत. शिवाय सामान्यांना सेवा आणि सुविधा देण्यासाठी आमची यंत्रणा सक्षम केली जाईल.
डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड