परळी ( बीड) : राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला असून राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे हे आज सकाळी मुंबईत दाखल झाले आहेत. आ. मुंडे हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. सोमवारी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेऊन आ. मुंडे तातडीने मुंबईकडे रवाना झाले होते. मुंबईत दाखल झाल्यानंतर आ. मुंडे यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती आहे.
माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे अजित पवार हे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांचे समर्थक आ. धनंजय मुंडे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे. पहाटेची शपथविधी वेळी देखील आ. मुंडे अजित पवार यांच्यासोबत होते. त्यानंतर प्रत्येक राजकीय घडामोडीत आ. मुंडे हे अजित पवारांच्या समर्थनात दिसून आले आहेत. यामुळे अजित पवार यांच्या संभाव्य भाजपा प्रवेशाच्या बाजूने राष्ट्रवादीतील किती आमदार आहेत याचे गणित जुळवणे सुरु आहे. यातच आ. मुंडे अचानक मुंबईत दाखल झाल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेऊन थेट मुंबईकडे रवानामागील आठवड्यापासून आ. धनंजय मुंडे हे परळी शहरात होते. जवाहर शिक्षण संस्थेच्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी त्यांनी 15 एप्रिल रोजी आश्रयदाता सभासद गटातून उमेदवारी दाखल केली. या जागेसाठी दुसऱ्या कुणाचा उमेदवारी अर्ज दाखल नसल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. तसेच जवाहर शिक्षण संस्थेच्या इतर संचालक निवडी, परळी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक तयारी आणि ग्रामीण भागात पेयजल योजनेच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आ. मुंडे हे परळी शहरात होते. मात्र, सोमवारी अचानक दुपारी दोन वाजेच्या सुमारास आ. मुंडे प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आले. येथून ते थेट मुंबईकडे रवाना झाले.