लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : स्पर्धा परीक्षेमध्ये ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थी यशस्वी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मनात कसलाही न्यूनगंड न बाळगता आजच्या स्पर्धेच्या युगात मोबाईल, टीव्ही यासारख्या माध्यमांचा वापर करून स्पर्धा परीक्षेचा गड सर करावा, असे प्रतिपादन शिवस्वराज सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन शहागडकर यांनी केले.
तालुक्यातील शिदोड येथील महालक्ष्मी विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करातना शहागडकर बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चव्हाण होते तर व्यासपीठावर डोंगरे, वाव्हळ, फाटे, साळुंके, सानप, गुजर आदी उपस्थित होते.
उस्मानाबाद जिल्ह्यातील सेवानिवृत्त प्रा. अरविंद देशमुख हे मागील आठवड्यात शिदोड येथील श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी आले असता, त्यांनी श्री महालक्ष्मी विद्यालयाला भेट दिली होती. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांची विचारपूस करून होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आणि दप्तराची मदत देऊ, असे सांगितले. दिनांक २ फेब्रुवारी रोजी त्यांनी हे शालेय साहित्य खरेदी करून दिले. त्यानंतर ३ फेब्रुवारी रोजी या साहित्याचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्माराम वाव्हळ यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वचिष्ठ शिंदे, बाबाराम थोरात यांच्यासह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. शालेय साहित्याचे वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.