लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : छापील किमतीपेक्षा वाढीव दराने रासायनिक खते विक्री होत असल्यास थेट भरारी पथकाशी संपर्क साधून रीतसर लेखी तक्रार करावी. असे आढळून आल्यास संबंधित कृषी दुकानदारावर निश्चितपणे कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी बी.टी. सोनवणे यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना केले आहे.
खरीप हंगामासाठी एप्रिल २०२१ पूर्वीचा व त्यानंतर पुरवठा झालेली खतांचा साठा सर्व खत विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे. एप्रिल २०२१ पूर्वीचा म्हणजे खताच्या किमती वाढण्याअगोदरचा खत साठा सर्व रासायनिक खतांच्या गोणीवरील छापील किमतीनेच विक्री करावा. जर कोणी दुकानदार जुना साठा नवीन दराने विकत असेल तर संबंधित खरेदीदाराने तसे लेखी तक्रार तालुका कृषी कार्यालयात द्यावी.
तालुक्यातील शेतकरी पेरणीसाठी आवश्यक असलेले रासायनिक खते, बियाणे खरेदीसाठी मोठ्या बाजारात गर्दी करीत आहेत. शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना रासायनिक खताच्या पोत्यावर असलेल्या छापील किमतीपेक्षा जास्त पैसे देऊ नयेत. वाजवीपेक्षा अधिक रक्कम दुकानदार आकारणी करीत असेल तर खरेदी पावतीच्या आधारे लेखी तक्रार शेतकऱ्यांनी द्यावी.
केविड-१९ च्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी न करता तालुक्यामध्ये एकूण ६३० शेतकरी गट व १३ शेतकरी कंपनी स्थापन आहेत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी गटामार्फत खतांची एकत्रित खरेदी करावी. गटामार्फत खतांची खरेदी करायची असल्यास संबंधित गावाचे कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक यांच्याशी संपर्क साधावा. त्यांच्याकडून खतांचे नियोजन करण्यात आले आहे.
...
काळाबाजार रोखण्यासाठी पथके
बियाणे खते व कीटकनाशके विक्री होताना शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये. खतांची साठे बाजी होणार नाही यासाठी तालुक्यात कृषी विभागाने पथके तयार केले आहेत. त्यामध्ये तालुका कृषी अधिकारी बी.टी. सोनवणे, पथक प्रमुख अनिरुद्ध सानप, गट विकास अधिकारी पंचायत समिती एस. ए. दराडे, निरीक्षक वजन मापन रवी मुंडे, कृषी अधिकारी यांचा या पथकामध्ये समावेश आहे.