अंबाजोगाई :
छापील किमतीपेक्षा वाढीव दराने रासायनिक खते विक्री होत असल्यास थेट तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून रीतसर लेखी तक्रार करावी. निश्चितपणे संबंधित दुकानदारांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी आर. डी. बर्वे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
नवे दर लागू झालेले रासायनिक खते अंबाजोगाई येथेच काय परंतु अद्याप राज्यात दाखल झाले नाहीत, तरीही बाजारात मात्र जुन्या दरातील रासायनिक खते कच्चे बिल देत वाढीव पैसे घेऊन विक्री होत असल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत. तालुका कृषी अधिकारी यांनी याबाबत वेळीच लक्ष्य घालणे आवश्यक आहे.
खरीप हंगामाच्या पेरणीच्या दृष्टिकोनातून तालुक्यातील शेतकरी पेरणीसाठी आवश्यक असलेले रासायनिक खते, बियाणे खरेदी करण्यासाठी मोंढा बाजारात गर्दी करीत आहेत. रासायनिक खतांच्या पोत्यावर असलेल्या छापील किमतीपेक्षा जादा पैसे आकारले जात आहेत. अशा तक्रारी शेतकऱ्यांनी केल्यात. त्याचबरोबर पावती दिली जात नाही. दिलीच तर साध्या कागदावर दिली जाते.
येत्या खरीप हंगामासाठी कृषी सेवा केंद्रावर रासायनिक खते खरेदी करतेवेळी कोणताही वितरक किंवा दुकानदार छापील किमतीपेक्षा जास्तीच्या दराने विक्री करीत असतील तर त्यासंबंधी कृषी विभागाकडे लेखी स्वरूपात तक्रार करावी. किंवा संपर्क साधावा. कोविड -१९ च्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी न करता जास्तीत जास्त शेतकरी गटांमार्फत खतांची एकत्रित खरेदी करावी.
...
पक्की पावती घ्या
खरेदी करतेवेळी खरेदीची पक्की पावती घ्यावी. जर कोणताही खत विक्रेता खरेदीची पक्की पावती देण्यासंबंधी नकार देत असेल तर कृषी विभागातील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी तालुका कृषी अधिकारी बर्वे यांनी केले आहे.
...