बीड: फिटनेस प्रमाणपत्रासाठी प्रतिवाहन पाचशे रुपयांप्रमाणे चार वाहनांचे दोन हजार रुपये लाच मागितल्याप्रकरणी चार महिन्यांनंतर मोटार वाहन निरीक्षकासह खसगी व्यक्तीवर २० दिवसांपूर्वी गुन्हा नोंद करुन अटक केली होती. यातील तक्रारदारावर अन्य एका मोटार वाहन निरीक्षकाने शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा ९ फेब्रुवारी रोजी नोंदवला.
रविकिरण नागनाथ भड या मोटार वाहन निरीक्षकास २० जानेवारी रोेजी लाच मागणीच्या आरोपाखाली अटक केली होती. त्यामुळे खळबळ उडाली होती. दरम्यान, यातील तक्रारदार ॲड.बक्शू अमीर शेख यांच्यावर ९ फेब्रुवारी रोजी बीड ग्रामीण ठाण्यात मोटार वाहन निरीक्षक गणेश जयराम विघ्ने (३४) यांनी तक्रार दिली. त्यानुसार, वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र देण्यासाठी पुरेसे कागदपत्रे नसल्याने विघ्ने यांनी नकार दिला. त्यावर आताच एकाला अडकवले आहे, तुम्हालाही अडकवीन, अशी धमकी देत चुकीचे काम करुन घेण्यासाठी दबाव आणत शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. ॲड. बक्शू अमीर शेख यांच्यावर बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. उपनिरीक्षक देवीदास आवारे तपास करत आहेत.