बीड : बीड नगरपालिकेचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी पदाचा दुरूपयोग करत मोठ्या प्रमाणावर अनियमितता, आर्थिक गैरव्यवहार केल्याने त्यांच्याविरुद्ध अपात्रतेची कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा आशयाची तक्रार आ. संदीप क्षीरसागर यांनी नगरविकास मंत्री यांच्याकडे दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत शासनाने कारवाई करण्यासाठी तातडीने पावले उचलले असून याप्रकरणी अहवाल सादर करण्याबाबतचे आदेश बीड जिल्हाधिकाऱ्यांना नगरविकास राज्यमंत्री तनपुरे यांच्या मान्यतेने दिला आहे. याबाबत तशी नोटीस कक्ष अधिकारी प्रवीण पाटील यांनी ५ मार्च २०२१ रोजी काढल्याने नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
तक्रारीत आ. क्षीरसागर यांनी म्हटले की, बीड नगरपालिकेचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या विरुद्ध महाराष्ट्र नगरपरिषद व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम ५५ अ व ब नुसार तसेच महाराष्ट्र नगर रचना प्रादेशिक अधिनियम १९६६ चे कलम ४७ व १२४ (ड) आर्थिक अनियमितता करून पालिकेचे, शासनाचे नुकसान केले आहे. त्याचबरोबर नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी पालिकेत मनमानी कारभार करत शासनाचे नुकसान केले आहे. यासह इतर बाबींचा समावेश असलेली तक्रार आ. क्षीरसागर यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे दाखल केली होती. यावर आता शासनाने नगरविकास राज्यमंत्री यांना आदेश विनंतीने कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी केलेली अनियमितता, पालिकेतील गैरव्यवहार या अगोदरच जिल्हाधिकारी, बीड यांच्याकडे तक्रारी दाखल झालेल्या आहेत. या प्रकरणामध्ये तत्कालिन जिल्हाधिकारी, बीड यांनी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्याविरुद्ध अपात्रतेची कारवाई सुरू करण्यात यावी, अशी विनंती शासनाला केलेली आहे. त्याचबरोबर नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी बीड पालिकेत अनियमितता केल्याप्रश्नी मोठ्या प्रमाणावर निरीक्षणे नोंदवले आहेत. आता या प्रकरणात शासनाने अहवाल मागितला असून ३१ मार्च २०२१ पर्यंत बीड जिल्हाधिकारी यांनी अहवाल द्यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
===Photopath===
080321\08bed_22_08032021_14.jpg
===Caption===
नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर