औरंगाबाद - बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमरसिंह पंडित, माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्यासह 28 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
आमदार पंडित यांनी त्यांच्या जय भवानी सहकारी साखर कारखान्यासाठी बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून 14 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्ज मिळवताना त्यांनी कारखान्याची जमीन त्यांनी तारण म्हणून ठेवली होती. हीच जमीन आमदार पंडित यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे दुस-या व्यक्तीस साडेतीन लाख रुपयांना विकली.
त्यामुळे बँकेचे सहव्यवस्थापक आसाराम पिराजी सुर्वे यांच्या तक्रारीवरुन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गेवराई पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.