बीड : अमृत अटल पाणीपुरवठा योजनेची उर्वरित कामे तातडीने पूर्ण करा, अशा सूचना नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी संबंधितांना दिल्या. बीड नगर परिषदेत शहरात सुरू असलेल्या अमृत अटल पाणीपुरवठा योजनेच्या संदर्भात नगराध्यक्ष क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्य पाइपलाइनचे काम पूर्ण होत आले असून, १०० मीटर वगळता बाकी सर्व कामे पूर्ण झाल्याचे सांगत कार्यकारी अभियंता गौरव चक्के यांनी २५ एमएलडी क्षमतेच्या शुद्धीकरण केंद्राचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. बीड शहरात आतापर्यंत २१० किलोमीटर लांबीचे वितरण व्यवस्थेचे काम पूर्ण झाले असून, १९ झोनपैकी ६ झोन तातडीने कार्यान्वित करण्याच्या तसेच उर्वरित कामे ३० जूनपूर्वी पूर्ण करून बीड शहरास अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याच्या सूचना नगराध्यक्षांनी बैठकीदरम्यान दिल्या.
याप्रसंगी शहरातील उपस्थित नगरसेवकांनी औरंगाबाद विभागाचे मुख्य अभियंता लोलापोड यांच्यासमोर आपापल्या प्रभागांतील समस्या मांडून रखडलेल्या विकासकामांचा पाढाच वाचला. ही रखडलेली कामे लवकरात लवकर पूर्ण केली नाही तर कंपनीच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले. नगरसेवकांनी मांडलेल्या समस्यांची दखल घेऊन मुख्य अभियंता यांनी तातडीने चौकशी व स्थळ पाहणी करून त्या सोडविण्यासंदर्भात सूचना केल्या.
यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी बीड शहरात आत्तापर्यंत २१० किलोमीटर लांबीचे पाणी वितरण व्यवस्थेचे काम पूर्ण झाल्याची माहिती दिली. तसेच शहरातील सारडा संकुलसमोरील पाण्याच्या टाकीचे काम वगळता इतर सर्व जलकुंभांची कामे झाल्याचे सांगितले.
संथ गतीने होणाऱ्या भुयारी गटार योजनेच्या कामाबाबत नगराध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली. यावर भुयारी गटार योजनेचे आतापर्यंत झालेल्या ५० किलोमीटर कामामध्ये झालेल्या रस्त्याच्या सुधारण्याचे काम तातडीने हाती घेण्यात येईल, असे कार्यकारी अभियंता यांनी सांगितले.
दरम्यान, दोन्ही कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी सूचना नगराध्यक्षांनी दिल्यानंतर मुख्य अभियंता यांनी अधीक्षक अभियंता यांना कारवाईचे आदेश दिले. बैठकीत औरंगाबाद विभागाचे मुख्य अभियंता लोलापोड, अधीक्षक अभियंता सिंग, न. प. मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे यांच्यासह बांधकाम सभापती विनोद मुळूक, नगरसेवक मुखीद लाला, रवींद्र कदम, शुभम धूत, अश्फाक भाई, अजहर भाई, उपअभियंता जोगदंड, सहायक अभियंता वाघ, न.प. अभियंता राहुल टाळके व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कर्मचारी उपस्थित होते.
===Photopath===
280521\28bed_4_28052021_14.jpg
===Caption===
अमृत अटल पाणी पुरवठा योजनेची उर्वरित कामे तातडीने पूर्ण करा, अशा सूचना नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी संबंधितांना दिल्या.