बीड : केंद्र शासनाच्या समाज कल्याण विभागामार्फत शिष्यवृत्ती मिळावी, यासाठी खरे उत्पन्न व नोकरीचे वेतन लपवून खोट्या स्वयं घोषणा पत्राद्वारे बीड तहसील कार्यालयातून बनावट उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढले. याप्रकरणी बीड शहरातील ६ नोकरदार पालकांसह त्यांच्या पाल्यावर शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समाज कल्याण विभागामार्फत गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादा अडीच लाख होती. असे असतानाही शिष्यवृत्ती मिळण्यासाठी दोन पालकांनी त्यांच्या व्यवसायातील खरे उत्पन्न व निमशासकीय नोकरीतील लपविले. खोट्या स्वयं घोषणा पत्राद्वारे बीड तहसील कार्यालयातून ४० हजार रुपयांचे डिजिटल स्वाक्षरीचे बनावट उत्पन्नाचे दाखले प्राप्त केले. त्याआधारे शिष्यवृत्तीचा अर्ज भरून अपहार केला.
याप्रकरणी रवींद्र पुंजाजी भालशंकर, संगीता रवींद्र भालशंकर उर्फ संगीता दशरथ त्र्यंबके, आदित्य रवींद्र भालशंकर, शुभम उर्फ लक्ष्मीकांत राजेंद्र भालशंकर, राजेंद्र पुंजाजी भालशंकर, संगीता राजेंद्र भालशंकर उर्फ संगीता गोविंद शिंदे, ज्ञानेश्वरी राजेंद्र भालशंकर उर्फ ज्ञानेश्वरी नामदेव कटके, माहेश्वरी राजेंद्र भालशंकर (सर्व रा. मदिना मस्जिदशेजारी, ढोरगल्ली, खडकपुरा, पेठ बीड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक टाकसाळ करीत आहेत.