धारूर : येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकांसह वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर येथील कारभार चालत असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. तत्काळ येथील रिक्त पदे भरावीत अशी मागणी होत आहे.
धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात सध्या सर्व सुविधा असताना तज्ज्ञ डाॅक्टर्स व कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याने रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकाचे पद गेल्या सात वर्षांपासून रिक्त आहे. या पदाचा पदभार प्रभारी अधिकाऱ्याकडून चालविला जात आहे. या वैद्यकीय अधिकाऱ्याला स्वतःचे काम करून हे व्यवस्थापन सांभाळावे लागते. त्यामुळे हे प्रमुख पद सांभाळणाऱ्याची कसरत होत आहे. आता तर फक्त एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर येथील कारभार असून इतर तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णांची मात्र हेळसांड होत आहे. एकीकडे कोरोनाच्या संकटाचा सामना येथील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना करावा लागत असताना त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे. ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञ डाॅक्टर्सअभावी खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत असून आर्थिक झळ सहन करावी लागत आहे.
ग्रामीण रुग्णालयात ऑपरेशन थिएटर, एक्सरे मशीन, ई सी जी मशीन सर्व सुविधा अद्ययावत असताना केवळ डाॅक्टरांअभावी यांचा उपयोग होत नाही. येथे एक्सरे मशीन उपलब्ध आहे. मात्र, एक्सरे टेक्निशियन नसल्याने ती बंद आहे. येथील सेवक परिचारकांची पदेही रिक्त आहेत. येथील ग्रामीण रुग्णालयात सध्या आयुष विभागाचे दोन व शालेय तपासणी विभागाचे जे डाॅक्टर आहेत, ते रूग्ण तपासणीसाठी मदत करतात. बाह्य रूग्ण विभाग व रात्रपाळीची ड्युटी करण्याची वेळ या डाॅक्टरांवर आली आहे. हे ग्रामीण रुग्णालय नावाजलेले असल्याने व परिसरातील मोठे उपचार केंद्र असल्याने बाह्यरूग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे येथील वैद्यकीय अधीक्षक व वैद्यकीय अधिकाऱ्यांची तसेच आवश्यक कर्मचाऱ्यांची इतर रिक्त पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी होत आहे.
लवकरच डॉक्टरांची नियुक्ती करू
धारूर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त जागांची अडचण आहे, याबाबत माहिती आहे. लवकरच काही दिवसांत येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. रुग्णांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल.
- डॉ. सूर्यकांत गित्ते, शल्य चिकित्सक, बीड.
===Photopath===
300321\img_20210327_215827_14.jpg