हातगाडे रस्त्यावर; वाहतुकीची कोंडी
अंबाजोगाई : शहरात शिवाजी चौक, सावरकर चौक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मुख्य रस्त्यावर सातत्याने हातगाडे रस्त्यावर लावण्यात येत असल्याने वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. यासंदर्भात नगर परिषद प्रशासनाने हातगाडे रस्त्याच्या बाजूला न लावता हातगाडे पाठीमागे सरकून लावण्यासाठी कारवाई करावी व रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी होत आहे.
पाणंद रस्त्याची दुर्दशा ; नागरिकांची कसरत
अंबाजोगाई : तालुक्यातील मुडेगाव येथील पाणंद रस्ते परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहून गेले आहेत. ते दुरुस्त करून शेतकऱ्यांची गैरसोय दूर करावी, सध्या रस्ते वाहून गेल्याने शेतात येण्या- जाण्यासाठी मोठा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. शेतात ट्रॅक्टर, दुचाकी वाहने व इतर वाहने जात नसल्याने शेतीची अनेक कामे खोळंबली.
मोबाईल चोरींच्या घटनांमध्ये वाढ
अंबाजोगाई : शहर व परिसरात भरणाऱ्या बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत आहे. प्रामुख्याने आंबेडकर चौक ते अण्णाभाऊ साठे चौक या ठिकाणी मोठी गर्दी होते. दर आठवडी मंगळवारच्या बाजारतही मोठी गर्दी असते. गर्दीचा फायदा घेत अनेक जणांच्या मोबाईलची चोरी झालेली आहे. अशा घटना वारंवार घडत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी लक्ष देऊन मोबाईल चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.