कार्यालयाच्या भिंती रंगलेल्याच
अंबाजोगाई : शासकीय कार्यालयांच्या भिंतींवर ‘येथे थुंकू नये’ अशा सूचना लिहिलेल्या असतात; परंतु त्याच शासकीय कार्यालयातील कर्मचारी व कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांकडून त्याचे सातत्याने उल्लंघन होते. परिणामी, शासकीय कार्यालयाच्या भिंती रंगलेल्याच दिसतात. यावर कडक कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.
नेकनूर परिसरातील नद्यांतून वाळूउपसा
बीड : तालुक्यातील नेकनूर परिसरातील सात्रा पोत्रा, चांदेगाव या नदीपात्रात वाळूतस्करांनी उच्छाद मांडला आहे. रात्रीच्या वेळी जेसीबीच्या साहाय्याने वाळूचा उपसा करून टिपरने व ट्रॅक्टरने वाहतूक केली जात आहे. याकडे संबंधित महसूल विभाग व नेकनूर पोलिसांचे मात्र दुर्लक्ष होत असल्याने शासनाला मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. हा वाळूचा उपसा बंद करावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
आरटीओ कार्यालयात एजंटांची गर्दी
बीड : येथील आरटीओ कार्यालयात सध्या एजंटांची पुन्हा गर्दी वाढू लागली आहे. परवाना व इतर कागदपत्रे काढण्यासाठी हे एजंट लोक पैशांची मागणी करून सामान्यांची आर्थिक लूट करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, सामान्यांच्या कामांकडे दुर्लक्ष करून एजंटांच्या कामाला येथील अधिकारीही प्राधान्य देत आहेत. यामुळे सर्वसामान्यांची कामे होईनासे झाले आहेत.
बांधकाम साहित्य रस्त्यावरच
अंबाजोगाई : शहरात ठिकठिकाणी बांधकामे सुरू आहेत. बांधकाम करताना लागणारे वाळू, खडी, विटा हे बांधकाम साहित्य सातत्याने रस्त्यावरच टाकण्यात येते. परिणामी, शहरवासीयांना रस्त्यावरून ये-जा करताना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. ढिगाऱ्यातील वाळू रस्त्यावर पसरत असल्याने दुचाकी व अन्य वाहने घसरत आहेत. यामुळे लहान-मोठ्या अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. रस्त्यावरील साहित्य हटविण्याची मागणी होत आहे.