लोकमत न्यूज नेटवर्क बीड : बीडच्या जिल्हा रुग्णालयात बुधवारी सकाळच्या सुमारास लसीकरणावरून गोंधळ उडाला. यावेळी गर्दी नियंत्रणाचा प्रयत्न करणाऱ्या बीडच्या पोलीस उपअधीक्षकांनाही धक्काबुक्की झाली. पोलिसांनी या प्रकरणात तिघांना ताब्यात घेतले आहे. इतरांचा शोध पोलीस घेत आहेत.
बीडच्या जिल्हा रुग्णालयात सध्या लसीकरणावरून रोजच गोंधळ होत आहे. बुधवारी १० ते ११ वाजण्याच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात गर्दी झाली होती. यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोहेकॉ. अनुराधा गव्हाणे व होमगार्ड सय्यद हे गर्दी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत होेते. मात्र, त्यांना न जुमानता काही जणांनी गोंधळ सुरूच ठेवला. त्यानंतर उपाधीक्षक संतोष वाळके व त्यांचे अंगरक्षक पो.शि. डोके त्याठिकाणी गेले. यावेळी समजावून सांगत असताना याचे वादात रूपांतर झाले. सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली. यामध्ये पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके हे किरकोळ जखमी झाले. तसेच त्यांचे अंगरक्षक डोके यांच्या अंगठ्याला यावेळी मार लागला, तर होमगार्ड सय्यद यांच्या पायावर रॉड मारून जखमी केले. पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिवीगाळही करण्यात आली. याप्रकरणी विवेक फुटाणे, महेंद्र फुटाणे, पार्थ फुटाणे, नितीन राजेंद्र फुटाणे (रा. नेकनूर), स्वप्निल पवार (रा. पंचशीलनगर), अक्षय सानप यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड : गर्दी नियंत्रण करताना पोलिसांची दमछाक गर्दी नियंत्रण करताना झालेल्या वादातून धक्काबुक्की होताच पोलिसांनी दोघांना बेदम मारहाण केली. यावेळी मात्र लसीकरणासाठी आलेल्या सर्वांचीच धावपळ झाली. कोरोनाचे नियम पायदळी तुडविल्याचे दिसून आले.