- सोमनाथ खताळ
बीड : आरोग्य विभागातील ( Health Department Transfers ) बदल्या सुरू झाल्या आहेत. आष्टीला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री शिंदे असतानाही पुन्हा एका अधिकाऱ्याची नियूक्ती करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर दोन महिन्यांपूर्वीच प्रमोशनवर सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून आलेले डॉ.रौफ शेख यांची पुन्हा वसमत येथे तालुका आरोग्य अधिकारी म्हणून नियूक्ती केली आहे. असे प्रकार राज्यभरात अनेक ठिकाणी झाल्याचा संशय आहे. यानिमित्ताने आरोग्य विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. ( In health department transfer Demotions of promoters and given post when there are no vacancies )
राज्यातील ४१२ वैद्यकीय अधिकारी गट-अ संवर्गाच्या बदल्यांचे आदेश ९ ऑगस्ट रोजी शासनाचे सहसचिव वि.ल.लहाने यांनी काढले आहेत. यात आष्टी येथे तालुका आरोग्य अधिकारी म्हणून लातूरच्या भातागळी आरोग्य केंद्रातील डॉ.सगीर पठाण यांची नियूक्ती केली आहे. वास्तविक पाहता या पदावर १४ जूलै रोजी डॉ.जयश्री शिंदे या रूजू झालेल्या आहेत. विशेष म्हणजे त्या परमनंट आहेत. मग त्यांची जागा भरलेली असतानाही त्याच जागेवर नवीन अधिकाऱ्याची नियूक्ती कशी केली? असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, या सर्व प्रकारावरून आरोग्य विभागातील बदल्यांमध्ये मोठा घोळ झाल्याचे उघड होत आहे. मंत्रालयातील अधिकारी हे आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी जिल्हास्तरावरून कसलीही माहिती न घेता पदभरती करत असल्याचे या प्रकारावरून उघड झाले आहे. आता यात नवीन अधिकाऱ्यांना रूजू करून घेतात की जागा रिक्त नाही, असा अहवाल पुन्हा शासनाला पाठवितात, हे वेळच ठरविणार आहे.
हेही वाचा - बीडमधील प्रकल्प प्रेरणा विभागावर कारवाईची टांगती तलवार; संचालकांकडून चौकशीचे आदेश
रौफ यांच्याकडे डीएचओचा पदभारकळमनुरी जि.हिंगोली येथून पदोन्नतीने डॉ.रौफ शेख बीडला आले. दोन महिन्यांपासून चांगले काम केल्याने त्यांच्याकडे जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला. आता त्यांची वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदलीत नाव आले आहे. यादीत नाव पाहूण आपल्यालाच धक्का बसल्याचे डॉ.रौफ म्हणाले. याबाबत वरिष्ठांना विचारणार असल्याचेही ते म्हणाले.
मी वरिष्ठांना विचारते - डॉ.शिंदेमाझी १४ जूलै रोजी आष्टी तालुका आरोग्य अधिकारी म्हणून नियूक्ती झालेली आहे. आता माझ्या जागेवर पुन्हा दुसऱ्याची नियूक्ती केल्याने मलाही धक्काच बसला आहे. याबाबत वरिष्ठांना विचारते, असे आष्टीच्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जयश्री शिंदे यांनी सांगितले.