वाळू उपसा सुरूच
गेवराई : तालुक्यातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. त्याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा फटका पर्यावरणाला बसत असल्याचे गोदाकाठच्या नदीपात्रांमध्ये दिसत आहे. अवैध वाळूमाफियांवर नियंत्रण ठेवून कारवाईची मागणी होत आहे.
कचऱ्यावर प्रक्रिया करा
अंबाजोगाई : तालुक्यातील अनेक गावांमध्ये कचऱ्याचे ढीग मोठ्या प्रमाणावर साठलेले आहेत. या कचऱ्यावर कुठल्याही प्रकारची प्रक्रिया करण्यात येत नसल्याने कचऱ्याचे मोठ-मोठे ढीग ठिकठिकाणी दिसून येतात. परिणामी ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शासनाने कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारण्याची मागणी होत आहे.
गुरांना उपचार मिळेनात
चौसाळा : येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार घेण्यासाठी अनेक पशुपालक आपल्या जनावरांना घेऊन येतात. मात्र, त्याठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी अनेकवेळा उपस्थित नसल्याने उपचाराविनाच परतावे लागत आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकारी नेमण्याची मागणी पशुमालक, ग्रामस्थांमधून केली जात आहे.
बाजारात फळांची विक्री वाढली
अंबाजोगाई : अंबाजोगाईच्या बाजारपेठेत केळी, मोसंबी, पेरू, सफरचंद, डाळिंब, अंजीर या फळांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बाजारात दररोज आवकही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सी विटॅमिनच्या फळांना मागणी असून परवडणारे दर असल्याने ग्राहकही फळांची मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत तसेच सहसा उन्हाळ्यात येणारी फळे जसे की, टरबूज, खरबूज आदी या दिवसांत मिळत असल्याने नागरिकांचा ओढा ही फळे खरेदीकडेही दिसून येत आहे.
हिंगणी ते नांदूर रस्त्याची दुरावस्था कायम
बीड : तालुक्यातील हिंगणी ते नांदूर रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. मागील अनेक दिवसांपासून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. दरम्यान, रस्त्यावरून जाताना वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे मणक्याचे आजार जडू लागले आहेत. अनेक वेळा मागणी करूनही रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्याने या भागातील नागरिकांना याचा त्रास दिवसेंदिवस वाढू लागला आहे.