काँग्रेस-राष्ट्रवादीची भाजप सरकार विरोधात सायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 05:59 PM2018-05-28T17:59:01+5:302018-05-28T17:59:01+5:30
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयावर सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी सरकारच्या धोरणाचा निषेध करत आंदोलकांनी प्रचंड घोषणाबाजी केली.
माजलगाव (बीड ) : विश्वासघातकी मोदी सरकारची सरकार स्थापन झालेला दिवस विश्वासघात दिन म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जाहीर करण्यात आला. त्यानिमित्ताने आज दोन्ही पक्षाच्यावतीने तहसील कार्यालयावर सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी सरकारच्या धोरणाचा निषेध करत आंदोलकांनी प्रचंड घोषणाबाजी केली.
भारतीय जनता पार्टीचे सरकार स्थापन होऊन देशात चार वर्ष पूर्ण झाले आहेत. परंतु या चार वर्षात त्यांनी लोकहिताचे काम केले नसून महागाईने उच्चांक गाठला आहे. ट्रोल डिझेलच्या दारवाडीमुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे हे सरकार विश्वासघातकी असून त्याचा स्थापना दिन विश्वासघात दिन असल्याचे कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसने जाहीर केले. सरकारच्या कार्यपद्धतीचा आणि धोरणाचा निषेध करत दोन्ही पक्षांनी तहसील कार्यालयावर संयुक्तरीत्या सायकल रॅली काढली.
यावेळी आंदोलकांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या मांडून सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर आंदोलकांनी नायब तहसीलदार रामदासी यांना निवेदन दिले. रॅलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष जयसिंह सोळंके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नारायण होके, पंचायत समिती सभापती जयंत नरवडे, कचरू खळगे,नगरसेवक शेख मंजूर, विजय शिंदे,मनोज फरके,सुशांत पौळ,राहुल लंगडे, भागवत भोसले आदींचा सहभाग होता.