अंबाजोगाई : अंबाजोगाईचे नगराध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाचे मातब्बर नेते राजकिशोर मोदी ( Rajkishor Modi ) यांनी आपल्या समर्थकांसह गुरुवारी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil ) , उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) , पालकमंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
अंबाजोगाईचे नगराध्यक्ष तथा बीड जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिट्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. स्वकर्तृत्वावर अंबाजोगाई नगर परिषद २५ वर्षापासून आपल्या ताब्यात ठेवणारे राजकिशोर मोदी यांनी गेल्या ४० वर्षापासून बीड जिल्ह्याच्या राजकारणात आपले राजकीय वलय निर्माण केले आहे ( Rajkishore Modi, who kept the Congress alive in Beed district is joins NCP) . सहकार, शिक्षण, सांस्कृतिक, समाजकारणाच्या माध्यमातून त्यांची ओळख सर्वदूर झाली आहे. काँग्रेस पक्षात मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ, कॉटन फेडरेशन व काँग्रेस पक्षातील विविध पदांवर त्यांनी काम केलेले आहे. महाविद्यालयीन जीवनापासून ते काँग्रेस पक्षात कार्यरत होते. बीड जिल्ह्याची काँग्रेस जिवंत ठेवण्याचे काम मोदीनी केले होते. मात्र, पक्षातील अंतर्गत गटबाजीला वैतागून त्यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकला.
राष्ट्रवादीला स्थानिक स्वराज्य संस्थेत होणार फायदा गेल्या ४० वर्षापासून राजकारणात काम करणाऱ्या मोदींना विधान परिषदेची संधी दोन वेळा उपलब्ध झाली होती. मात्र, दोन्ही वेळा ही संधी हुकली.आगामी काळात काँगेस पक्षात राहून भवितव्य नसल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. मोदी यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने आगामी नगरपालिकेच्या निवडणुका, बाजार समिती व सहकारातील विविध निवडणुका राष्ट्रवादीला जमेची बाजु ठरणार आहेत. अंबाजोगाई तालुक्यात राष्ट्रवादीचे तुल्यबळ नेतृत्व नव्हते. ती उणीव मोदींच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. तसेच मोदींच्या माध्यमातून एक नवा चेहरा पक्षाला मिळाला आहे.