माजलगाव (बीड ) : तालुक्यातील दक्षिण काशीमधील गोदावरी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पिण्यासाठी पाणी द्या म्हणून पंचायत समितीसमोर चालू केलेले आंदोलन अखेर दुसऱ्या दिवशी येथील तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे यांच्या तंबीपूर्ण मध्यस्थीने सुटले. यावेळी त्यांनी नळ कनेक्शन ग्रामपंचायतने तोडल्याप्रकरणी सरपंच व ग्रामसेवक यांना दोन दिवसात खुलासा देण्याबाबत तंबी दिली. तसेच खुलासा समाधानकारक न आल्यास सरपंचावर अपात्रतेचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदारांनी दिली.
गोदावरी विद्यालय मंजरथ या शाळेला १९८४ पासून नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. ग्रामपंच्यातच्या अनेक सदस्यांची मुले या शाळेत शिक्षण घेतात. ग्रामपंचायतअंतर्गत चाललेल्या परस्पर विरोधी राजकारणाने शाळेच्या पाणीपुरवठ्याच्या माध्यमातून चंचू प्रवेश प्रवेश केला आणि नेमकी माशी येथेच शिंकली. यावर विद्यार्थी त्यांचे पालक आणि सरपंच यांनी मागील दोन दिवसांत आपापल्या प्रतिष्ठेपायी पंचायत समितीसमोर उच्च प्रतिशोध नाट्य घडवून आणले. या नाट्यावर अखेर येथील तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे यांनी योग्य व तंबीपूर्ण भूमिका घेऊन तोडगा काढत पडदा पाडला. यात त्यांनी २२ जुलैपर्यंत ग्रामपंचायतने शाळेला असलेले नळ कनेक्शन सुरू करून द्यावे तसेच तोपर्यंत विद्यार्थाना जारने पिण्यासाठी पाणी पुरवावे, असे ठरले. जे ग्रामपंचायतने मान्य केले तसेच शाळेने देखील विद्यार्थ्यांना पुढे करून अशी आंदोलने करू नयेत, अशी समज शाळेला देण्यात आली.
या बैठकीच्या वेळी आंदोलनकर्त्यांसह संस्थेचे सचिव अजय बुरांडे, बाजार समिती सभापती अशोक डक, पं.स. उपसभापती डॉ. वसीम मनसबदार, जयदत्त नरवडे, गटविकास अधिकारी बी.टी.चव्हाण शहर ठाण्याचे पो.नि. सय्यद सुलेमान, ग्रामीण ठाण्याचे पी.आय. सुरेश बुधवंत उपस्थित होते. या आंदोलनाला माजीमंत्री प्रकाश सोळंके, नगरसेवक दीपक मेंडके, शरद यादव, काँग्रेसचे शेख अहेमद , कॉ. मुसद्दीक बाबा, कॉ. दत्ता डाके, कॉ. शिवाजी कुरे आदींनी भेटी दिल्या. या आंदोलनामुळे दिवसभर पंचायत समिती कार्यालय बंद राहिले.
ग्रामपंचायतने शाळेचा पाणीपुरवठा तोडला या प्रकरणी मानवीय दृष्टीकोन आणि नियम यांचा समतोल राखण्यासाठीची भूमिका घेत नोटिसद्वारे सरपंच आणि ग्रामसेवकांना दोन दिवसांत खुलासा मागविला आहे. याचा समाधानकारक खुलासा न आल्यास सरपंचांविरु द्ध अपात्रतेचा प्रस्ताव पाठविण्यात येईल. - डॉ. प्रतिभा गोरे, तहसीलदार माजलगाव.