पुरुषोत्तम करवा
माजलगाव : पंतप्रधान आवास योजनेत मंजूर झालेल्या घरकुलांचे काम तिसरा हप्ता न मिळाल्याने येथील नगरपरिषदेच्या वतीने थांबविण्याची वेळ आली आहे. घराचे अर्धवट बांधकाम झाल्यामुळे घरकुलधारक त्रस्त झाले असून, त्यांना किरायाच्या जागेत राहण्याची वेळ आली आहे.
पंतप्रधान आवास योजनेत येथील नगरपरिषद अंतर्गत २०१८-१९ मध्ये जवळपास ५५० लाभार्थींना घरकुल मंजूर झाले आहे. त्यातील २२५ लाभार्थींनी बांधकामास सुरुवात केल्याने त्यांना पहिला हप्ता ४० हजार रुपयांचा मिळालेला आहे, तर उर्वरित ३२५ लाभार्थींनी बांधकामास सुरुवातही केली नसल्यामुळे पहिला हप्ता मिळालेला नाही. या योजनेत दुसरा हप्ता ६० हजारांचा असून, तोदेखील केवळ दोनशेच लाभार्थींना मिळाला. मात्र दुसरा हप्त्याचा राज्य शासनाकडून निधी उपलब्ध न झाल्याने नगरपरिषदेने पहिल्या हप्त्यातून शिल्लक राहिलेल्या रकमेतून हा हप्ता वाटप केला होता.
या योजनेसाठी पहिला व दुसरा हप्ता राज्य शासनाकडून मिळतो, तर तिसरा व चौथा हप्ता केंद्र सरकारकडून देण्यात येतो. हे दोन्ही हप्ते केंद्र सरकारने अद्याप दिलेले नाहीत. शहरातील १५० लाभार्थींचे बांधकाम होऊनही त्यांना तिसरा हप्ता मिळालेला नाही. मात्र घरकुलांचे काम शेवटच्या टप्प्यात असताना पैशाअभावी घरकुलधारकांवर काम थांबविण्याची वेळ आली आहे. ज्या लाभार्थींनी जादाचे बांधकाम केले आहे, अशा घरकुलधारकांकडे गवंड्यांची मजुरी, सिमेंट-स्टील दुकानदारांची देणे थकल्याने हे लाभार्थी त्रस्त झाले आहेत.
बांधकामासाठी घरकुलधारकांनी आपले घर पाडल्याने व त्यांचे बांधकाम अर्धवट राहिल्यामुळे या नागरिकांना किरायाच्या घरात राहण्याची वेळ आली आहे. यामुळे किरायाचा भुर्दंड या नागरिकांना सहन करावा लागत आहे. नगरपरिषदेने याबाबत तातडीने दखल घेऊन थकलेले हप्ते द्यावेत, अशी मागणी होत आहे.
-----
तीन-चार महिन्यांपूर्वी शहरातील ५५० रहिवाशांना घरकुल मंजूर झाले. मात्र यातील एकही लाभार्थीस पहिला हप्ता मिळालेला नाही. पाया खोदल्यानंतर आता थांबण्याची वेळ आली आहे. उलट या लाभार्थींनी दलाल व नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना तात्काळ हप्ता मिळवून देण्यासाठी १५-१५ हजार रुपये दिले असल्याचे हे लाभार्थी सांगताना दिसत आहेत.
--------- या योजनेचा राज्य सरकारचा दुसरा हप्ता तसेच केंद्र सरकारचा तिसरा व चौथा हप्ता अद्याप मिळालेला नाही, शासनाच्या आदेशानुसार पहिल्या हप्त्याच्या आलेल्या निधीतून दुसरा हप्ता आम्ही दिलेला आहे. घरकुलधारकांना तात्काळ हप्ता देण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू असून, लवकरच निधी उपलब्ध होईल, अशी आशा आहे तर ज्या लाभार्थींना घरकूल मंजूर झाले आहे, अशा लाभार्थींनी दलाल व कर्मचाऱ्यांना एक रुपयाही देऊ नये.
-विशाल भोसले, मुख्याधिकारी, नगरपरिषद, माजलगाव
===Photopath===
280521\purusttam karva_img-20210528-wa0043_14.jpg~280521\purusttam karva_img-20210528-wa0045_14.jpg