रस्त्यावर धुळीचे थर
परळी : शहरात सर्वत्र रस्त्यावर धुळीचे प्रमाण वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, तसेच नागरिकांना याचा त्रास होत आहे. नगरपरिषदेने रस्त्यावरील धुळीचा बंदोबस्त करून रस्ते स्वच्छ ठेवण्याची मागणी आहे.
पथदिवे बंद
पाटोदा : शहरातील मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळातील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना ये-जा करण्यात अनेक अडचणी येत आहेत. तरी नगरपंचायतीने याकडे लक्ष देऊन पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे.
स्वच्छतेची मागणी
बीड : जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणावर घाण दिसून येत आहे. येथे काम करणारे कर्मचारी आणि कामासाठी येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे स्वच्छतेची मागणी होत आहे.
झुडपे तोडावीत
वडवणी : ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर बाभळी व इतर झाडांच्या फांद्या वाढल्यामुळे वळणावर समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही. परिणामी, अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. फांद्या तोडण्याची मागणी होत आहे.
कोंडी कायम
बीड : शहरातील भाजीमंडईत प्रत्येक रविवारी आठवडी बाजार भरतो, परंतु येथील अरुंद रस्ते व अस्ताव्यस्त पार्किंगमुळे कोंडी कायम राहत आहे. पालिका अथवा पोलिसांकडून यावर कसलीच कारवाई होत नाही.