माजलगांव ( बीड ) , दि. १७ : निधी मंजूर झाला असतानाही जागेअभावी अनेक दिवसांपासुन रखडलेल्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या बांधकामाला अखेर सुरुवात झाली आहे. परंतु, या बांधकामासाठी नगर परिषदेकडुन रितसर परवानगीच घेतली नसल्याची धक्कादायक माहिती समोर समोर आली आहे. तसेच हि जागा बाजारतळासाठी प्रस्तावित असल्याने शहरात हा विषय चर्चेचा ठरत आहे.
माजलगांव येथे उपविभागीय कार्यालय सुरु होवून जवळपास 4 वर्षे झाली. स्वतंत्र इमारत नसल्याने सुरुवातीपासूनच हे कार्यालय तहसील कार्यालयाच्या इमारतीत सुरु आहे. जागे अभावी तहसील कार्यालयामध्ये उपविभागीय कार्यालय चालविणे अडचणीचे होत असल्याने स्वतंत्र इमारतीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला. शासनानेही सकारात्मक निर्णय घेत कार्यालयासाठी नविन इमारतीला मान्यता देत निधी देखील उपलब्ध करुन दिला.यानंतर तहसील कार्यालयाच्या समोरील सर्व्हे नं. 380 मधील जागेत कार्यालायचे बांधकाम सुरु झाले. मात्र, इमारत बांधकामासाठी नगर परिषदेकडुन आवश्यक असलेला बांधकाम परवानाच घेतला नसल्याची माहिती आता उघडकीस आली आहे. सामान्य नागरिकांप्रमाणेच शासकीय कार्यालये सुद्धा विनापरवाना बांधकाम करत असल्याचे यातून स्पष्ट झाले.
यासोबतच याच जागेसाठी नगर परिषदेने बाजारतळाचा प्रस्ताव मंत्रालयाकडे मंजुरीस पाठविलेला आहे. यावर निर्णय प्रलंबित असतानाच हे बांधकाम विनापरवाना सुरु झाल्याने यामागे बाजारासाठी जागा मिळु न देण्याचे राजकारण असू शकते अशी चर्चा ऐकावयास मिळत आहे.
लवकरच परवाना घेऊ उपविभागीय कार्यालयाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे. याचा बांधकाम परवाना आम्ही नगर पालिकेकडुन अद्याप घेतलेला नाही. लवकरच रितसर कारवाई करुन परवाना घेण्यात येईल. - डी. के.पाटील, उपविभागीय अभियंता, सा.बां. उपविभाग
कारवाई करू उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या बांधकाम परवान्या बाबत कसल्याही प्रकारची मागणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे विनापरवाना चालु असलेले हे बांधकाम तात्काळ थांबविण्याची कारवाई करण्यात येईल.- सहाल चाउस, नगराध्यक्ष,माजलगांव नगर परिषद