बीड : कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्यात आला असला तरी त्यांची माहिती पाेर्टलवर अपडेट करण्यात राज्यातील २७ जिल्हे कमी पडले आहेत. अद्याप ३० लाख लोकांची माहिती अपडेट न केल्याने आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र काढले आहे, तर दुसऱ्या बाजूला नोंदणी करण्यात बीड जिल्हा अव्वल असून, औरंगाबादचा नीचांक आहे.
राज्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात येत नसल्याने लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. हा संसर्ग कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी अद्याप पूर्णपणे यश आलेले नाही, तसेच नवे रुग्ण शोधण्यासाठी बाधितांच्या संपर्कातील लोकांचा शोध आराेग्य विभाग घेत आहे. राज्यात आढळलेल्या ५१ लाख ४३ हजार ९६७ कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेतल्यानंतर त्यांची माहिती पोर्टलवर तात्काळ अपडेट करणे आवश्यक होते; परंतु आतापर्यंत केवळ २१ लाख ४८ हजार ४४७ रुग्णांच्या सहवासितांचीच माहिती अपडेट केली आहे. राज्यातील २७ जिल्ह्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले असून, त्यांची टक्केवारी ८० पेक्षा कमी आहे. यात सर्वांत आघाडीवर औरंगाबाद असून, केवळ ३० टक्के माहिती अपडेट केल्याचे समोर आले आहे. हाच धागा पकडून आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी राज्यातील सर्वच जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र काढून माहिती अपडेट करण्याच्या सूचना केल्या आहेत.
बीड जिल्ह्याचे काम ९९ टक्के
राज्यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात बीड जिल्हा सुरुवातीपासूनच अव्वल राहिला आहे. तसेच याची माहितीही आरोग्य विभागाच्या नियंत्रण कक्षातून नियमित अपडेट केली जाते. यात बीड जिल्हा राज्यात अव्वल असून, ९९ टक्के माहिती अपडेट केली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार यांनी वारंवार आढावा घेतला. डॉ. बेग व नियंत्रण कक्षातील सर्व अधिकारी, कर्मचारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वेळेत माहिती दिल्याने जिल्हा अव्वल राहिला आहे.
...अशी आहे राज्याची आकडेवारी
माहिती अपलोड करण्यात आलेली
जिल्हानिहाय आकडेवारी...
बीड ९९ टक्के, जालना ९८, सातारा ९१, अमरावती ८८, नांदेड ८७, धुळे ८६, सांगली ८४, सिंधुदुर्ग ७९, नागपूर ७८, नाशिक ७७, कोल्हापूर ७७, परभणी ७६, यवतमाळ ७२, भंडारा ७०, अकोला ७, सोलापूर ६९, जळगाव ६४, रायगड ६४, नंदुरबार ६३, हिंगोली ६३, गडचिरोली ६१, बुलडाणा ६१, वर्धा ५८, मुंबई ५६, पालघर ५२, अहमदनगर ५२, उस्मानाबाद ५१, चंद्रपूर ४९, रत्नागिरी ४३, पुणे ४२, लातूर ३७, वाशिम ३६, ठाणे ३३, औरंगाबाद ३०, अशी टक्केवारी आहे.