लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : शहराची स्वच्छता करण्यासाठी नगरपालिकेने नियुक्त केलेल्या ठेकेदाराने मागील चार दिवसांपासून अचानक शहरात स्वच्छतेचे काम थांबविले आहे. कचरा वाहून नेणाऱ्या घंटागाड्या जागीच उभ्या आहेत. परिणामी शहरात जागोजागी घाण, कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. जागोजागी नाल्या तुंबल्याने रस्त्यावरून पाणी वाहत आहे. यामुळे शहरात दुर्गंधी पसरली आहे.
नगरपरिषदेने सहा महिन्यांपूर्वी निविदा काढून औरंगाबाद येथील एका कंपनीला स्वच्छतेचा ठेका दिला होता. परंतु, संबंधित ठेकेदाराने मागील चार दिवसांपासून अचानक शहरातील कचरा गोळा करणाऱ्या घंटागाड्या बंद करून स्वच्छतेचे काम बंद केले. त्यामुळे शहरात घराघरांत कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत, तर रस्त्यावर जागोजागी घाण दिसू लागली आहे.
सहा महिन्यांपूर्वी माजलगाव नगरपालिकेने स्वच्छतेचे टेंडर काढले होते. संबंधित ठेकेदाराने हे टेंडर ३६ लाख रुपयांना घेतले होते. सुरुवातीला संबंधित ठेकेदाराने शहरातील स्वच्छतेचे काम उत्कृष्ट केले. संबंधित ठेकेदाराने नगरपालिकेने घालून दिलेले सर्व नियम धाब्यावर बसवून काम चालू ठेवले होते. हा ठेकेदार मनमानी करीत असताना त्यास नगरपालिकेच्या वतीने किंवा पदाधिकाऱ्यांच्या वतीने साधी विचारणा देखील करण्यात आली नाही. याचा तो गैरफायदा घेत आहे. ठेकेदार कधीही काम बंद करीत आहे, तर कधीही सुरू करीत आहे.
नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी सुरुवातीला त्यास वारंवार त्रास देणे चालू केले होते. त्याने सर्वांचे तोंड बंद केल्यानंतर त्यास काम करू दिले जाऊ लागले. त्यामुळे त्याने सुरुवातीपेक्षा आपली यंत्रणा एकदम निम्म्यावर आणली. संबंधित ठेकेदाराने अचानक चार दिवसांपासून शहरात फिरणाऱ्या घंटागाड्या, साफसफाई, नालीची स्वच्छता करणे थांबविले आहे. यामुळे शहरात जागोजागी घाण दिसत आहे. घंटागाडी फिरत नसल्यामुळे घरोघरी कचऱ्याचे ढीग साचले आहेत.
...
शहराची स्वच्छता करणाऱ्या ठेकेदाराने नगरपालिकेतील पदाधिकाऱ्यांकडून वारंवार त्रास होत असताना एक वेळा सर्व पदाधिकाऱ्यांची बोळवण केली. तरीही काही पदाधिकारी त्रास देत असल्याने संबंधित ठेकेदाराने चार दिवसांपासून शहरातील स्वच्छतेचे काम बंद केले आहे, असे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
...
संबंधित ठेकेदाराने विनापरवाना काम बंद केले आहे. त्याबद्दल त्यास नोटीसही बजावली आहे. आम्ही दोन दिवसांपासून मजूर लावून शहरातील साफसफाई सुरू केली आहे.
- शेख मंजूर, नगराध्यक्ष.
....
===Photopath===
220521\img_20210212_115112_14.jpg
===Caption===
माजलगाव शहरात ठेकेदाराने स्वच्छतेचे काम थांबविले आहे. यामुळे ठिकठिकाणी कच-याचे ढीग साचलेले दिसत आहे.