अनिल भंडारी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : ‘निर्मल वारी हरित वारी’ अभियानातून श्री संत मुक्ताई पालखी सोहळ्यातून दिंडीमार्गावर झाडे लावून बिया रोवून पर्यावरणाला हातभार लावण्याचा आगळावेगळा प्रयत्न होत आहे.
मुक्ताईनगर ते पंढरपुर पालखी मार्गावर वड, चिंच, पिंपळाची मोठी झाडे होती. वारी दरम्यान वारकरी या झाडांच्या सावलीत विसावा घेत, झाडांच्या पारंब्यांना झोका घ्यायचे. हे सगळं काळाच्या ओघात संपले. त्यामुळे यावर्षी पालखी सोहळ्यातून निर्मल वारी हरित वारी अभियान आम्ही राबविले आहे. मुक्ताईनगर येथून निघाल्यानंतर पालखी मार्गावरील ग्रामपंचायत, सामाजिक संस्थांच्या मदतीने वृक्ष लागवडीचा कार्यक्रम होती घेतला आहे. बाभुळ, चिंच, पिंपळ, वडाची दिडशे झाडे लावली तसेच सर्वच ठिकाणी या झाडांचे बी पेरत आलो आहोत. या झाडांना ‘मुक्ताई वृक्ष’ असे नाव देऊन संगोपनाचे आवाहन केले आहे.आमची पालखी छोटी, पण प्रश्न मोठे३०९ वर्षांची परंपरा असलेल्या संत मुक्ताबाई पालखीचे आणि बीडचे ऋणानुबंध घट्ट आहेत. निजामाच्या काळातही आषाढी वारीला कोणताही त्रास होता कामा नये, असे फर्मान निजाम सरकारचे होते. आता मात्र पालखी सोहळ्याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत पालखी प्रमुख रविंद्र महाराज हरणे यांनी व्यक्त केली. आषाढी वारीनिमित्त निघणारे सात मानाचे पालखी सोहळे आहेत. दोन मोठ्या पालखी सोहळ्यांकडे ज्या प्रमाणात लक्ष दिले जाते त्याप्रमाणे छोट्या पालखी सोहळ्यांकडेही सरकार, प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी, राहण्याची व्यवस्था, मोबाईल टॉयलेट आदी मुलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.