बीड : आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांना बी-बियाणे व खतांची टंचाई भासू नये, यात त्यांची फसवणूक होऊ नये. यासाठी कृषी निविष्ठा नियंत्रणासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे.
आगामी काळात बियाण्यांचा योग्य प्रमाणात पुरवठा व्हावा, गुणवत्ता असावी यासाठी या कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. यात बियाणे, खते व कीटकनाशकांच्या पुरवठ्याबाबत शेतकरी व कंपनी प्रतिनिधी विक्रेत्यांना क्षेत्रीय स्तरावर वेगवेगळ्या अडचणी येत आहेत. त्यातच कोरोनामुळे टाळेबंदी जाहीर झालेली आहे. कोरोनाच्या काळात बियाणे, खते व कीटकनाशके यांची उत्पादन प्रक्रिया वाहतूक व वितरणात अडचणी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे खते व बियाणे पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे. हे विचारात घेऊन कृषी निविष्ठांच्या संबंधित अडचणी, तक्रारी निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, बीड कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापन करण्यात आली आहे. यात दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी डी.जी. मुळे, कृषी विकास अधिकारी सुभाष साळवे यांनी केले आहे.
फसवणूक केल्यास होणार कारवाई
मागील वर्षात काही ठिकाणी सोयाबीनचे बोगस बियाणे बाजारात आल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. तर, काही ठिकाणी चढ्या दराने खतांची विक्री केल्याचे प्रकार देखील समोर आले होते. यावर्षी अशा पद्धतीने शेतकऱ्यांची फसवणूक केली आणि त्यासंदर्भात नियंत्रण कक्षात तक्रार प्राप्त झाल्यानंतर, चौकशी करून संबंधित कृषी सेवा केंद्र चालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.