: माजलगाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून दिंद्रुड सर्वपरिचित आहे. या गावाला राजकीयदृष्ट्या मोठे महत्त्व आहे. येथील ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. १५) मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमानुसार बुधवारी सायंकाळी ५ वाजता प्रचार यंत्रणा थंडावल्या आहेत. दिंद्रुड ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये परिवर्तन ग्रामविकास आणि जनसेवा ग्रामविकास हे दोन पॅनल आमने-सामने लढत आहेत. मात्र केवळ चार सहकारी सोबत घेत दिंद्रुड ग्रामविकास आघाडी या तिसऱ्या पॅनलनेही निवडणुकीत उडी घेतली आहे. १५ सदस्यसंख्या असलेल्या या निवडणुकीत दोन पॅनलने प्रत्येकी १५, तर एका पॅनलचे केवळ चार उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. मुख्यमंत्री आरोग्य कक्षाचे माजी प्रमुख तथा भूमिपुत्र ओमप्रकाश शेटे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत सहभाग न घेता अलिप्त राहणे पसंत केले आहे, तर गत निवडणुकीत पॅनल केलेले दिलीप पारेकर व सुंदर ठोंबरे यांनीही कुठलीच भूमिका न घेतल्याने उद्याच्या मतदानाकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
परिवर्तन ग्रामविकास पॅनलने प्रचारात जरी आघाडी घेतली असली तरी पॅनलप्रमुख दिलीप हरीनाथ कोमटवार यांच्याविरुद्ध त्याच प्रभागात त्यांचे ज्येष्ठ बंधू अशोक कोमटवार निवडणूक लढवत आहेत. दोन सख्खे भाऊ परस्परविरोधी निवडणूक लढवत असल्याने केवळ याच प्रभागाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.