अनिल भंडारी
बीड : कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत प्रशासनाकडे प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यातील ३०३ मुलांचे मातृपितृ छत्र हरवले. यापैकी २७४ मुलांच्या वडिलांचा मृत्यू झाला. अशा विदारक परिस्थितीमुळे आता आईलाच पालकत्वाची दुहेरी जबाबदारी सांभाळावी लागणार आहे. कोरोना महामारीत अनेकांवर आभाळ कोसळले. मातृ-पितृछत्र हरवलेल्या मुलांच्या भविष्याचा गंभीर प्रश्न लक्षात घेत शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने या मुलांच्या पुनर्वसनाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात ७ जूनपर्यंत कोरोनामुळे २०५८ मृत्यूची नोंद झालेली आहे. तर आतापर्यंत जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त माहितीनुसार कोरोना संसर्गाच्या लाटेत जिल्ह्यातील ३०३ बालकांचे मातृ-पितृछत्र हरवले आहे. आतापर्यंतच्या माहितीनुसार २७४ मुलांचे वडिलांचे छत्र हरवले आहे. त्यामुळे या कुटुंबांवर आभाळ कोसळले आहे. घरातील कर्त्या वडिलांचे छत्र हरवल्यामुळे मुलांना सांभाळण्याची जबाबदारी आईवर आली आहे. आता आईलाच आयुष्याच्या परीक्षेत दोन्ही भूमिका पार पाडाव्या लागणार आहेत. तर बाबा दूर देशी गेला तरी आईच सांभाळ करणार, असा विश्वास मुलांमध्ये आहे. दु:खाला मागे सारत उद्याच्या संकटांशी सामना करण्यासाठी मुलांच्या पुनर्वसनाबरोबरच त्यांच्या आईला सामाजिक, शासकीय आणि मानसिक पातळीवर बळ देण्याची गरज आहे.
आभाळच फाटले जोडायचे कसे?
१) धारूर तालुक्यातील मुस्लीम समाजातील एक कुटुंब कामानिमित्त औरंगाबादला राहत होते. टेलरिंगचे काम करणारे वडील घरातील कर्ता माणूस होते. घरात पत्नीसह सतरा वर्षांची मोठी मुलगी, तर पंधरा आणि नऊ वर्षांची दोन मुले. वडिलांना टेलर कामातून मिळणाऱ्या रोजगारातून या कुटुंबाचा उदरनिर्वाह, शिक्षण सुरू होते; पण कोरोनाच्या लाटेने या घरातला कर्ता माणूस गेला आणि कुटुंबाचे आभाळ फाटले. हे कुटुंब आता गावाकडे आले आहे. तीन मुलांचा सांभाळ, त्यांचे शिक्षण करताना आईलाच फाटलेले आभाळ शिवण्याचे काम करावे लागणार आहे.
--------
अकाली वैधव्यात चिमुकलीच आशेचा किरण
२) शोभाचे (बदललेले नाव) दोन वर्षांपूर्वी लग्न झाले. पतीसोबत पुण्याला राहत होती. नंतर शोभा बाळंतपणासाठी माहेरी आली. कन्यारत्न जन्माला आले. कोरोनाचा संसर्ग सर्वत्र पसरलेला होता. त्या- त्या ठिकाणच्या प्रशासनाचे निर्बंध होते. पुणे तर हॉटस्पॉट. पाच महिन्यांपूर्वी पतीचे कोरोनामुळे निधन झाले. लेकीला पाहण्याआधीच बाबा दूर देशी निघून गेला. हा पहिला धक्का बसलेला असतानाच शोभा आणि तिच्या चिमुकलीचा सासरच्या मंडळीने स्वीकार केला नसल्याने दुसरा धक्का बसला. अकाली कोसळलेले वैधव्य आणि वर्षभराच्या चिमुकलीच्या भविष्याचा प्रश्न शोधत शोभा सध्या माहेरीच दु:ख पचवित आहे.
------
३) तुटपुंजा शेतीच आधार, चार लेकरांचा भार
अंबाजोगाई तालुक्यातील एका कुटुंबातील कर्ता पुरुष कोरोनाने हिरावला. घरात पत्नी, २ वर्ष, ४ वर्ष, ७ वर्ष आणि ११ वर्ष वयाच्या चार लेकरांचे छत्र हरपले. आता मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी आईवर आली आहे. उदरनिर्वाहाचे दुसरे साधन नाही. आहे त्या तुटपुंजा शेतीचाच आधार, त्यावरच लेकरांचा भार सांभाळावा लागणार आहे. आयुष्यभराचे दु:ख गिळत शेतीतूनच तिला उभारी घ्यावी लागणार आहे.
४) लेकीच्या लग्नाआधीच पित्याचा निरोप
बीड जिल्ह्यातील एका कुटुंबात दोन मुली, दोन जुळी मुले आहेत. मोठी मुलगी १७ तर दुसरी १५ वर्षांची मुले ७ वर्षांची. येत्या दोन वर्षात मोठीचे लग्न करण्याचे स्वप्न पिता पाहत होता. परंतु कोरोनाच्या लाटेने या कुटुंबातील पिता हिरावला. जेमतेम शेती असलेल्या या कुटुंबातील आईला दुहेरी पालकत्वाची जबाबदारी सांभाळावी लागणार आहे.
--------------
शासनाच्या निर्देशानुसार कोरोनामुळे आई- वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलांना जिल्हा महिला बालविकास विभागाच्या माध्यमातून बालगृह तसेच बाल संगोपन योजनेतून लाभ देण्याची कार्यवाही सुरू आहे.
तसेच त्यांच्या आईला शासनाच्या निराधार, विधवा, कुटुंब सहायता योजनेतून प्राधान्यक्रमाने लाभ मिळवून देण्याबाबत आयुक्तांचे निर्देश आहेत.
त्यानुसार माहिती घेण्याचे काम सुरू असून तालुकानिहाय तहसील कार्यालयांना यादी पाठवून सहानुभूतीपूर्वक लाभ देण्यासाठी प्रयत्न होणार असल्याचे परिविक्षा अधिकारी एस. एस. निर्मळ यांनी सांगितले.
--------
आई- वडिलांचे छत्र हरवले
आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात ३०३ पैकी ३ मुलांचे आई आणि वडिलांचा मृत्यू झाला. तर २६ मुलांचे मातृछत्र आणि २७४ मुलांचे पितृछत्र हरवले आहे. हे आकडे काळीज चिरणारे आहेत.
----------