मूषकाने गुड मॉर्निंग म्हणत... चरण स्पर्श केले. काय रे... बाप्पांनी त्याचा कान पकडला. त्यावर मूषक म्हणतो, महाराज आज निरोप नाही का... बाप्पांनी कॅलेंडरकडे कटाक्ष टाकत 'अरे हो रे, लक्षात आहे...' म्हणून का पहाटेच उठून बसायचे असते का...? असा सवाल केला. त्यावर मूषक म्हणतो, अहो खूप कामं आहेत बाकी... आवरा लवकर... मी बॅग भरून ठेवतो तोपर्यंत. मूषक सामानाची आवराआवर करेपर्यंत बाप्पा तयार झाले. बाप्पा अंगावरील उपरणे सावरतच दरबारात आले...चल निघायचं ना... मूषक टुणकन् उडी मारून बाप्पांच्या पुढ्यात येतो अन् म्हणतो... हो महाराज, भक्तगणांचे खूप सारे कॉल येताहेत... यंदा ना मंडपात दर्शन, ना मूखदर्शन, तरीही भक्तांनी त्याच उत्साहात सेवा केली. आता दहा दिवस मुक्कामी राहून परत जाण्यापूर्वी त्यांची गाऱ्हाणी ऐका... बाप्पांनी सोंड पुढे करून हं... म्हणत मूषक काय बोलतो हे ऐकण्यासाठी कान सुपाएवढे केले. महाराज, कोरोनाची आपत आली अन् कित्येकांच्या सुखी संसाराला दृष्ट लागली. कोणी जीवलग गमावले, तर कोणाचे बालवयातच मातृपितृ छत्र हिरावले. अंत्यसंस्कारावरही 'बंधने' आली. रेमडेसिवीर ... ऑक्सिजन व बेडसाठीची धावाधाव... आक्रोश अन् किंकाळ्यांनी गहिवरलेली माणसं... भीती आणि धास्तीमध्ये वावरणारे चेहरे... या सगळ्या भयावह परिस्थितीत आरोग्यकर्मींचा धीरोदात्तपणा अन् कोरोनामुक्त झालेल्यांचे आकडे हीच काय ती आशादायी बाब. कोरोनाने निर्माण झालेली करुण स्थिती ऐकून बाप्पाही भावुक झाले. मूषकाला त्यांनी जवळ घेतले... मूषकाचे डोळेही भरून आले होते. बाप्पांनी त्यास सावरले. मूषकाने आसवे पुसली अन् म्हणाला, महाराज... तुम्ही विघ्नहर्ता... कोरोनाला आवरा... अन् पब्लिकला सावरा... सरकारला अन् इथल्या नेत्यांना सदबुद्धी द्या... बाप्पांनी मानेने होकार दिल्यावर मूषक काहीसा खूश झाला. बाहेर भक्तगण गोळा झाले होते. निराेपाचा मुहूर्त जवळ येऊन ठेपला होता... तेवढ्यात मूषक म्हणतो... महाराज अहो, ते महत्त्वाचं काम राहिलं. बाप्पांना सुरुवातीला काही उमगेना... मूषक म्हणतो... अहो लस घ्यायची राहिली की... 'दो गजर दुरी मास्क है जरुरी' म्हणत बाप्पा त्यास मास्क लावायचे विसरल्याचीही आठवण करून देतात... तितक्यात 'गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या...' असा गजर होतो.
कोरोना आवरा... पब्लिक सावरा..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 4:34 AM