माजलगाव : जागतिक संसर्गजन्य रोग म्हणुन घोषित केलेल्या कोरोना व्हायरसचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी गुरुवारी माजलगाव शहरात तालुका माहेश्वरी सभा व पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण रूग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात 200 जणांनी रक्तदान केले.
कोरोनाचा जागतिक कहर झाल्यानंतर आपल्या देशात मोठ्या प्रमाणात काळजी घेतली जात आहे. या लढ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न शासन स्तरावर होत आहेत, त्यास जनतेची साथ मिळत आहे. या लढ्यासाठी बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी रक्तदान शिबिर घेण्याच्या केलेल्या आवाहनाला येथे प्रतिसाद मिळाला आहे. या रक्तदान शिबिराची सुरूवात उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले यांनी रक्तदान करून करण्यात आली. यावेळी आमदार प्रकाश सोळंके, सभापती अशोक डक,वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश साबळे, व्यापारी महासंघाचे सुरेंद्र रेदासनी,अनंत रुद्रवार,ऍड. बंडू डक,गणेश लोहिया, नंदू आनंदगावकर, प्रा.कमलकिशोर लड्डा, उमेश जेथलिया, उमेश मोगरेकर , विरेंद्र सोळंके ,बालाप्रसाद भुतडा , विनोद जाजु , सुदर्शन स्वामी , विजय मस्के ,भास्कर गिरी आदींची उपस्थितीती होती.
सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या रक्तदान शिबिरात बीड जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीचे पथक व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अनिल परदेशी,डॉ गजानन रुद्रवार यांच्या निगराणी खाली सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी , पत्रकार व नागरिक उस्फुर्तपणे सहभागी होत आहेत. त्यामुळे नोंदणी 350 जणांनी केली होती परंतु वेळे अभावी अनेकांना परत जावे लागले, यामुळे आज 200 जणांनी रक्तदान केले. पुढील आठवड्यात देखील रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे उमेश जेथलिया यांनी सांगितले.