गेवराई : उन्हाळ्यात तसेच एरव्ही शहरातील व ग्रामीण भागातील दुकाने, घरी, लग्न समारंभासह कार्यक्रमांच्या विविध ठिकाणी शुद्ध व थंडगार पाणीपुरवठा करणारे जार मालक व चालक कोरोनामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही बेजार झाले आहेत. कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे दुकाने बंद, लग्न समारंभ होत नसल्याने पाणी विक्रेत्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने मदत करावी, अशी मागणी येथील जार मालक, चालक,क र्मचाऱ्यांनी केली आहे.
मागील वर्षी उन्हाळा सुरू झाल्याबरोबर मार्च महिन्यात कोरोनाचा भारतात शिरकाव झाल्यानंतर तब्बल तीन महिने सर्व व्यापारी पेठा, लग्न समारंभासह सर्व काही बंद होते. तसेच याहीवर्षी उन्हाळा सुरू झाला की, व्यापारी पेठा, लग्न, धार्मिक कार्यक्रम बंद झाल्यामुळे शहरातील व तालुक्यातील अनेक जार मालक, चालक, कामगारांवर आर्थिक संकट ओढावले आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. काहीजणांनी कर्ज काढून थंड पाण्याचे प्लांट उभारले असून गुंतवणूक केली आहे. आता कर्जाचे हप्ते कसे फेडावे, अशी चिंता आता जार मालकांना पडली आहे.
गतवर्षी व याहीवर्षी कोरोना रोगाच्या प्रादुर्भावमुळे व्यापारी पेठा, लग्न समारंभ, यात्रा उत्सवसह अनेक कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे दुकानदार व लग्नात जार घेत नाहीत. त्यामुळे आमचे मोठे नुकसान होत असल्याचे येथील जार मालक राजेश राठोड यांनी सांगितले, तर आम्ही जार मालकाकडे रोजंदारीवर असून कोरोनामुळे बाजारपेठ बंद असल्याने आमचे नुकसान झाले आहे. पगारही वेळेवर मिळत नसल्याचे कामगार किरण भोसले यांनी सांगितले.
===Photopath===
200421\20210420_121354_14.jpg