किती दैना हो महाराज... मूषकाचा कंठ जड पडला अन् डोळे डबडबले. बाप्पांनी त्याच्या भावना ओळखल्या. त्याला सोंडेनेच जवळ ओढून घेतले अन् डोळे पुसत धीर दिला. काही वेळ दोघेही स्तब्ध झाले. बाप्पांनी मूषकाला स्वत:च्याच ताटात जेवायला बसवले. बरं पंचनामे कुठपर्यंत आले अन् कोरोनाची काय स्थिती, बाप्पांनी एकाच वेळी दोन प्रश्न केले. त्यावर मूषकानेही आपल्या खास अंदाजात उत्तर दिले... घाबरू नका, भरपाई मिळणार असे जिल्ह्याच्या कारभाऱ्यांनी सांगितलेय आणि राहिला विषय कोरोनाचा तर पहिली गेली, दुसरीही गेली आता तिसरीची प्रतीक्षा आहे. बाप्पांना काही उमगेना, तेव्हा मूषकाने ‘लाट’ म्हणायचं होतं महाराज मला. बाप्पांनी कपाळाला हात लावला अन् स्मितहास्य करून त्याचा कान पकडणार तोच महाराज, येतो मी गौराईंच्या स्वागताची तयारी करायचीय ना म्हणत मूषक टुणकन उडी मारून पळून गेला.
कोरोनाने बेजार, त्यात मुसळधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 4:32 AM