अंबाजोगाई : अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालल्याने एअर कंडिशन कोरोनासाठी धोकादायक समजला जातो. मात्र, उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अशा स्थितीत एसीला पर्याय म्हणून कूलर खरेदीकडे ग्राहकांचा मोठा कल वाढला आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्सची दुकाने बंद असल्याने कूलरही घेता येईना.
मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे मोठ्या कालावधीसाठी दुकाने बंद राहिली. इच्छा असतानाही अनेकांना विविध प्रकारच्या वस्तू खरेदी करता आल्या नाहीत. त्यामुळे घरात असलेल्या पंखा व जुन्या कूलवरच गरज भागविण्याची वेळ नागरिकांवर आली. मात्र, यावर्षी मार्च महिन्यापासूनच कूलर दुरुस्ती व नवीन कूलरच्या खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. त्यानंतर लॉकडाऊन पुन्हा सुरू झाले आणि खरेदी ठप्प झाली. गेल्या पंधरा दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली आहे. एअर कंडिशन कोरोनाच्या प्रादुर्भावास धोकादायक ठरते, अशा स्थितीत वातावरणात थंडावा निर्माण करण्यासाठी हाय स्पीडचे फॅन व कूलरला मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले जात आहे. शहरी भागात नागरिक दुपारच्या वेळी थंड हवेत आराम करण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे तापमानापासून संरक्षणासाठी कूलर फायदेशीर ठरत आहेत. बाजारातही विविध प्रकारचे कूलर्स विक्रीसाठी उपलब्ध झाले. नागरिकांनीही हायस्पीड फॅन व कूलर खरेदीला मोठ्या संख्येने प्राधान्य दिले असते. मात्र, गेल्या महिनाभरापासून इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिकल दुकाने बंद आहेत. त्यामुळे पैसे असूनही खरेदी करता येत नाही, अशी बिकट स्थिती ग्राहकांची झाली आहे. खरेदी करता येत नसल्याने अनेकांना भरउन्हाळ्यात तगमग सहन करावी लागत आहे.