अंबाजोगाई : मराठी वैशाख महिना म्हणजेच मे महिन्यात दरवर्षी सर्वात जास्त विवाह होतात;मात्र कोरोनामुळे या महिन्यात लग्न सोहळ्यांना मोठा ब्रेक लागला. परिणामी अनेकांचा हिरमोड झाला आहे. आचारी, वाजंत्री, मंगल कार्यालयवाले यांचेही बुकिंग रद्द झाले आहे.
कोरोनामुळे अनेकांचे लग्न सोहळे लांबणीवर पडले आहेत. अनेकांना आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करायची असते. यासाठी सोयीस्कर असा शुभमुहूर्त ठरविला जातो. वैशाख महिन्यात अनेक विवाह मुहूर्त असतात. या महिन्यात शेतीची कामे झालेली असतात. तर शाळांना सुट्टी असते. परीक्षा संपलेल्या असतात. त्यामुळे मे महिना सोयीस्कर ठरतो.
कोरोनाचा संसर्ग वाढतच चालल्याने सलग दोन वर्षे मार्च, एप्रिल व मे महिन्यात लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार बंद आहेत. शासनानेही विवाह सोहळ्यावर अनेक बंधने लादली आहेत. विवाह सोहळ्यात केवळ २५ जणांना उपस्थिती लावता येते. यातही सर्वच वऱ्हाडी मंडळींची कोरोना चाचणी बंधनकारक आहे. उपस्थितांची अट शासनाने घातल्याने अनेक जवळच्या नातेवाईकांचा रोष ओढवून घ्यावा लागत आहे. तर वाहने बंद असल्याने व खासगी वाहनांसाठी परवानगी घ्यावी लागते. अशा अनेक अडचणींचा सामना विवाहासाठी उपस्थित राहणाऱ्या नातेवाईकांना करावा लागत आहे. त्यातच बाजारपेठ बंद असल्याने विवाहासाठीची खरेदी ही व्यवस्थित होत नाही. तर जे विवाह सोहळे पार पडत आहेत त्या कुटुंबीयांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
...
विवाह मुहूर्त
आता अनेक जोडप्यांनी कोरोनानंतर असणाऱ्या विवाह मुहूर्तांचा शोध सुरू आहे. मे महिन्यात १४ मुहूर्त पंचांगात आहेत. तर जून महिन्यात आठ मुहूर्त आहेत.
....
व्यावसायिकांना आर्थिक फटका
लग्न म्हटले की, मंगल कार्यालय, आचारी, बँडबाजा, मंडप, घोडा, फोटोग्राफर, वाहने यांचे आगोदरच बुकिंग करावे लागते. तर लग्नपत्रिका, कपडेलत्ते, भांडीकुंडी, फर्निचर, दागदागिने यासह रुखवत आदी वस्तू लग्नमुहूर्तापूर्वी काही दिवस अगोदर खरेदी कराव्या लागतात; मात्र लॉकडाऊनमुळे आलेली बंधने, त्यात साधेपणाने उरकले जाणारे विवाह सोहळे यामुळे संबंधित व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. परिणामी आर्थिक चक्र मोठ्या प्रमाणात बिघडले आहे.