कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वन्यजिवांची प्रगणना करताना सोशल डिस्टन्स पाळता येणार नाही. त्यामुळे बुद्ध पौर्णिमेला नायगाव मयूर अभयारण्यातील वन्यजिवांची प्रगणना स्थगित करण्यात आली आहे. दरवर्षी वन्यजीव विभाग व डब्ल्यूपीएसए मार्फत बुद्ध पौर्णिमेला अभयारण्य परिक्षेत्रातील वन्यजिवांची प्रगणना करण्यात येते. त्यासाठी वन विभागाचे अधिकारी, वनक्षेत्रपाल, वनपाल, वनरक्षक व त्यांचे सहकारी तसेच निसर्गप्रेमी वन्यजीव अभ्यासक पौर्णिमेपूर्वीच तयारीला लागतात. वन हद्दीतील पाणवठे, पाणथळांच्या ठिकाणी मचाण उभारतात. प्रत्येक मचाणीवर एक कर्मचारी, सोबत एक निसर्गप्रेमी इच्छेनुसार बसतात. येथे दिवसरात्र बसून, वन कर्मचारी व निसर्गप्रेमी वन्यजीव प्रगणना करीत असतात. त्यातूनच प्राण्यांची संख्या घटली की वाढली, याची कल्पना येत असते. मचाणीवर एकापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील. सोशल डिस्टन्स पाळला जाणार नाही. प्रगणनेत कर्मचाऱ्यांसोबत एक निसर्गप्रेमी असतो. ही व्यक्ती बाहेरगावातून आलेली असते. या सर्व बाबींचा विचार करीत कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून २६ मे रोजी होणारी अभयारण्यातील वन्यजिवांची प्रगणना वन्यजीव विभागाने बंद ठेवली आहे.
वन्यजिवांच्या प्रगणनेला कोरोनाचा ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 4:33 AM