बीड : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता प्रत्येक गावात आरोग्य विभागाने 'कोरोना केअर सेंटर ' उभारून आरोग्य सुविधा देण्याची व्यवस्था करावी. तसेच लॉकडाऊनमुळे अनेक नागरी वस्त्यात गोरगरीब जनतेचे हातावर पोट असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यांना साधे रेशनचे धान्यसुद्धा मिळत नाही. लोकप्रतिनिधींनी आरोग्य सुविधेसह अन्नधान्य मिळवून देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटोळे यांनी केली आहे.
दंड होत नसल्याने बेफिकिरी वाढली बीड : तालुक्यात गुरुवारी कोरोनाचे ३२० रूग्ण आढळले असलेतरी नागरिक बेफिकीरपणे संचार करीत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नगरपरिषद प्रशासन व पोलीस ठाण्याच्या वतीने विनामास्क तसेच विनाकारण फिरणाऱ्यांसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.
वृक्षतोड थांबवा
पाटोदा : येथील डोंगररांगामधून मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत आहे. याकडे वनविभाग, प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, वृक्षतोड थांबवण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांमधून होत आहे. दरम्यान, सॉ मिल वर वेळोवेळी तपासणी करून कारवाई करण्याचीही मागणी होत आहे.
परिसरात अस्वच्छता
बीड : शहरातील सहयोग नगर भागातील शासकीय गोदाम परिसरात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे दुर्गंधी सुटून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वेळोवेळी सांगूनही स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. नगरपालिकेने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
पालवण रस्ता खराब
बीड : शहरातील धानोरा रोडकडे जाणाऱ्या नगररोड ते पालवन चौक भागात रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून ते बुजवण्यासाठी नागरीकांनी वेळोवेळी निवेदने देत उपोषण केले. मात्र काही ठिकाणचे खड्डे थातुरमातूर पध्दतीने बुजविले. रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडल्याने वाहने आदळत आहेत.