बीड : जिल्ह्यात कोरोना महामारीची दुसरी लाट अत्यंत त्रासदायक राहिली. अनेक कुटुंबांवर आभाळ कोसळले. अनेकांनी प्रिय व्यक्ती गमावल्या. आई-वडील, आजोबा, आजी, मामा, काका अशा नात्याची माणसं काळाआड गेली. अनेक मुलांचे मातृ- पितृछत्र हरवले. या मुलांच्या पुनर्वसनासाठी शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने पाऊले उचलली आहेत. या मुलांना बालसंगोपन तसेच बालगृहाच्या योजनेतून लाभ मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात १२०० महिलांच्या कपाळावरील कुंकू कोरोनाने पुसले आहे. पितृछत्र हरवलेल्या मुलांचा सांभाळ करणारी आई एकाकी पडली आहे. त्यांच्या मदतीसाठी शासनाच्या योजनेतून लाभ देण्याची गरज असून, शासनपातळीवर याचा शोध घेतला जात आहे. जिल्हा महिला बालकल्याण विभागाकडे १३ जूनपर्यंत प्राप्त माहितीनुसार ३१५ बालकांचे मातृ-पितृ छत्र हरवले आहे. यात २७ बालकांच्या आईचे निधन झाले आहे, तर २८२ मुलांच्या वडिलांचे निधन झाले आहे, तर सहा बालकांचे आई आणि वडील दोघेही मृत्यू पावलेले आहेत. तर बीड जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत २३०७ मृत्यूची नोंद झालेली आहे. यात १५६४ पुरुषांचा मृत्यू झाला आहे. विवाहित आणि अविवाहित अशी वर्गवारी उपलब्ध नसली तरी जवळपास १२०० महिलांच्या कपाळावरील कुंकू कोरोनाने हिरावले आहे.
------
कनिष्ठ संरक्षण अधिकारी करणार मदत
अशा महिलांना शासनाचा लाभ मिळावा म्हणून प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची जमवाजमव त्यांनी करावयाची आहे. संरक्षण अधिकाऱ्यांच्या गृहभेटीत संबंधितांचे आधार कार्ड, बँक खाते क्रमांक, रहिवासी पुरावा व इतर माहिती संकलित केली जात आहे. त्यांचे अर्ज भरण्यासाठीचे सोपस्कार कनिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यांमार्फतच पूर्ण केले जाणार आहेत. त्यामुळे अशा कुटुंबांना सैरभर होण्याची गरज राहणार नाही.
------------
जिल्हा टास्क फोर्सच्या बैठकीत ठरल्यानुसार संबंधित विधवा महिलांना संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी विधवा पेंशन योजनेत समाविष्ट करून लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. जिल्ह्यात ११ कनिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यांमार्फत गृहभेटीतून माहिती संकलित केली जात आहे. त्यानुसार यादी संबंधित तहसील कार्यालयाकडे दिली जाणार आहे.
- व्ही. एम. हुंडेकरी, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी, बीड.
----------
मातृ-पितृ छत्र हरवलेल्या ० ते १८ वयोगटातील मुलांना शासन निर्देशानुसार बालसंगोपन योजना तसेच बालगृहाचा लाभ दिला जाणार आहे. त्यांची माहिती संकलित करण्याचे काम यंत्रणेमार्फत सुरू आहे. त्याचबराेबर या सर्वेक्षणातून विधवा महिलांची माहिती संकलन करून त्यानुसार यादी तहसील कार्यालयाला पाठवून शासनाच्या प्रचलित योजनेचा लाभ देता येईल. जिल्हा टास्क फोर्स सजगतेेने काम करत आहे. - रवींद्र जगताप, जिल्हाधिकारी, बीड.
---------
कोरोनाचे एकूण रुग्ण - ८१२२९
बरे झालेले रुग्ण - ८५१९४
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण - १७३१
एकूण मृत्यू - २३०७
महिला मृत्यू - ७४३
-----------