बीड : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला सुरुवातीला जो प्रतिसाद मिळाला तो सध्या दिसत नाही. सर्वात पहिला डोस घेणारे हेल्थ केअर वर्कर्सही दुसऱ्या डोससाठी अनुत्साही दिसले. पहिल्या दिवशी ५५१ लाभार्थ्यांनी डोस घेतला होता. दुसऱ्या डोसला मात्र केवळ १०२ लाभार्थीच पुढे आले. फ्रंटलाईन वर्कर्स आणखीही अपेक्षेप्रमाणे लस घेण्यासाठी पुढे आलेले नाहीत. आतापर्यंत जिल्ह्यात ४४ टक्के लसीकरण झाले आहे.
जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला १६ जानेवारीला सुरूवात झाली. सर्वात अगोदर हेल्थ केअर वर्कर्सला ही लस देण्यात आली. बीडमध्ये पहिल्याच दिवशी ५५१ लोकांना ही लस टोचली होती. याच लसीचा दुसरा डोस २८ दिवसांनी दिला जात आहे. याबाबत सर्वांना संदेशही गेले. परंतु ५५१ पैकी केवळ १०२ लोकांनीच सोमवारी दुसरा डोस घेतला. २८ दिवसांपुढेही हा डोस घेण्यास जमत असले तरी जो उत्साह पहिल्या दिवशी होता, तो दुसऱ्या डोसला दिसत नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
२४ पैकी १० हजार लोकांनाच लस
आतापर्यंत ११ लसीकरण केंद्रांवर २४ हजार लाभार्थ्यांना देणे अपेक्षित होते. परंतु आतापर्यंत केवळ १० हजार ५५६ लाभार्थ्यांनीच लस घेतली आहे. याची टक्केवारी केवळ ४४ आहे. सुरुवातीला बीड जिल्हा राज्यात अव्वल होता. आता बीडचे स्थान खूप घसरले आहे.
आतापर्यंत झालेले लसीकरण
एकूण केंद्र - ११
रोजचे उद्दिष्ट २२००
---
हेल्थ केअर वर्कर्स
उद्दिष्ट १५९००
पूर्ण - ८८७४
---
फ्रंटलाईन वर्कर्स
उद्दिष्ट ८१००
पूर्ण १६८२