विष्णू गायकवाड
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : कोरोनामुळे बळीराजा हतबल झाला आहे. एकंदरीत बळीराजा मोठा आर्थिक संकटात आहे. आता पावसाळा तोंडावर आल्याने बळीराजा आपल्या शेतीच्या मशागतीसाठी पुन्हा शेतशिवारात दाखल झाला आहे. परंतु मशागतीचा खर्च वाढल्याने हा खर्च करायचा कसा, याची चिंता बळीराजाला भेडसावत आहे.
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. मागील वर्षी चांगला पाऊस होऊनही शेतकऱ्यांना कोरोनामुळे कमी भावात माल विकावा लागला. त्यात अवकाळी पाऊस, वादळ, गारपीट यासारख्या आपत्तीला सामोरे जावे लागले. आता पावसाळ्याचे दिवस तोंडावर आले आहेत. यामुळे पेरणीपूर्व मशागत सुरू केली आहे. परंतु मजुरीचे दर वाढल्याने व बैलांचा अभाव असल्याने शेतकरी तांत्रिक शेतीकडे वळला आहे. ट्रॅक्टरच्या साह्याने कमी वेळात शेतीची कामे आटोपून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
शेतकरी ट्रॅक्टरच्या साह्याने नांगरणी, वखरणी आदी कामांना पसंती देत आहे. मात्र त्यात डिझेलचे दर प्रचंड वाढल्याने नांगरणी, वखरणीच्या दरातही वाढ झाली आहे. खरीप हंगाम जवळ आला असताना शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही. त्यामुळे बी-बियाणे व शेती मशागतीचा खर्च कसा करावा, असा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभा ठाकला आहे. पावसाचे रोहिणी नक्षत्र २५ मेपासून सुरू होत आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
...
ट्रॅक्टर वखरणीचे दर असे...(प्रतिएकर)
नांगरणी-१४००ते १५०० रुपये
वखरणी-७०० रुपये
शेती लेव्हल-७०० रुपये प्रतितास
....
दरवर्षी खते बी-बियाण्यांच्या किमती वाढत आहेत. तर मोठ्या कष्टाने पिकविलेल्या पिकाला योग्य भाव मिळत नाही. आता डिझेल वाढीमुळे ट्रॅक्टरची भाडेही वाढले आहे. त्यामुळे शेतीत उत्पन्न कमी आणि खर्च अधिक होत आहे. या खर्चासाठी पैसा आणायचा कोठून असा प्रश्न उभा आहे.
-वैजनाथ शेजुळ, शेतकरी, खांडवी, ता.गेवराई.