पॉझिटिव्ह स्टोरी
बीड : सरकारी रुग्णालयातील उपचाराबद्दल तक्रारी असल्या तरी काही सकारात्मक गोष्टीही आहेत. कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असलेल्या ६५ वर्षीय वृद्धाचा एचआरसीटी स्कोअर १७ होता. मिनिटाला १५ लिटर ऑक्सिजन लागायचा. परंतु योग्य उपचार करून डॉक्टर, परिचारिकांनी त्याला ठणठणीत करून घरी पाठविले. यावेळी तो भावनिक झाला. त्याला अश्रू अनावर झाले होते.
बीड तालुक्यातील साखरे बोरगावचे अंबादास वाघमारे (वय ६५) हे २९ जुलै रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. संशय दूर होण्यासाठी त्यांची आरटीपीसीआर आणि अँटिजन चाचणी केली. सुदैवाने दोन्हीही निगेटिव्ह आल्या. त्यानंतर एचआरसीटी केल्यावर स्कोअर १७ आला. रुग्ण घाबरला होता. ऑक्सिजन लेव्हलही कमी असल्याने प्रति मिनिट १५ लिटर ऑक्सिजन दिले जात होते. रेमडेसिवीर, लोमो, एमपीएस आदी औषधी दिल्यानंतर तीन दिवसांपासून ऑक्सिजन लेव्हल ठीक झाली. १६ ऑगस्ट रोजी त्याला जिल्हा ओल्ड लेबर या वॉर्डातून सुटी देण्यात आली. यावेळी रुग्ण भावुक झाला होता. १८ दिवस खूप काळजी घेतली. समाधान वाटले. आता घरी गेल्यावर आम्ही तुमची आठवण काढू, अशी भावनिक प्रतिक्रिया वृद्धाने डॉक्टरांसमोर दिली. रुग्ण ठीक होऊन जाताना सर्वांच्याच चेहऱ्यावर समाधान होते.
....
यांनी केले उपचार
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे, डॉ. सुखदेव राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. रेवडकर, डॉ. संतोष धूत, डॉ. बाळासाहेब टाक, डॉ. शीतल चिंचखेडे, डॉ. विशाल वनवे, डॉ. प्रिया मुंडे, डॉ. प्रवीण घाडगे, संध्या सानप, शीतल साबळे, सोनाली काळे, नेहा लांडे, सुनील गिरी, वैभव लोहार, शुभांगी शिंदे आदींनी त्यांच्यावर उपचार करून शुश्रूषा केली.
---
जिल्हा रुग्णालयात दर्जेदार व चांगल्या प्रकारेच उपचार मिळतात. गंभीर रूग्ण ठणठणीत होऊन गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. आमची सर्व टीम रुग्णांची काळजी घेत आहे. उपचारात हलगर्जी करणाऱ्यांना लागलीच सूचना केल्या जातात.
-डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड.
160821\16_2_bed_8_16082021_14.jpeg
जिल्हा रूग्णालयातून अंबादास वाघमारे यांच्याकडे डिस्चार्ज कार्ड देताना वैद्यकीय अधिकारी डॉ.शितल चिंचखेडे व त्यांची टिम दिसत आहे.