बीड : जिल्ह्यात कोरोनामुळे कुपाेषित बालकांकडेही दुर्लक्ष झाल्याचे दिसते. जिथे वर्षाला १०० पेक्षा जास्त प्रवेश होत असतात, तेथे गतवर्षात केवळ ६ बालकांचा प्रवेश झाला आहे. त्या सर्वांवर जिल्हा रूग्णालयातील पोषण आहार केंद्रात उपचार केले आहेत. परंतू यापुढे तरी पालकांनी बालकांकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन एनआरसीमार्फत करण्यात आले आहे.
जन्मानंतर ६ महिन्यांपासून ते ५ वर्षांपर्यंतच्या बालकांचे गावागावात सर्वेक्षण केले जाते. वय, उंची, वजन याची माहिती घेऊन बालकाला तात्काळ जिल्हा रूग्णालयातील पोषण आहार केंद्रात पाठविण्यात येते. प्रत्येक वर्षाला १०० पेक्षा जास्त बालके या केंद्रात येऊन १४ दिवस उपचार घेतात. आणि नंतर ठणठणीत होऊन घरी परततात. २०१५ ते २०१९ पर्यंत तब्बल ७०० बालकांवर उपचार करण्यात आले. परंतु २०२० या वर्षांत केवळ सहाच बालकांचा प्रवेश झाला आहे. कोरोनामुळे लागलेले लॉकडाऊन आणि अंगणवाडी, शाळा बंद असल्याने तसेच आशाताई, अंगणवाडी सेविकाही कोरोना सर्वेक्षणात व्यस्त असल्याने या बालकांचा शोध घेणे अशक्य झाल्याचे दिसते. तसेच पालकांनीही स्वता:हून पुढे येणे टाळल्याचे यावरून दिसते. परंतु पालकांनी कुपोषणाची थोडेही लक्षणे जाणवताच तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्राचा सल्ला घेऊन एनआससी विभागात दाखल करणे आवश्यक आहे.
तीन वर्षांत ३१४ बालके कुपोषणमुक्त
मागील तीन वर्षांत ४५० बालकांवर एनआरसी विभागात उपचार करण्यात आले. यात १४ दिवस उपचार करून एकूण वजणाच्या १५ टक्के वजन वाढल्यानंतर त्यांना सुटी दिली जाते. अशी ३१४ बालके कुपोषणमुक्त झाले आहेत. घरी गेल्यानंतरही प्रत्येक महिन्याच्या १५ व ३० तारखेला पाठपुरावा करून आढावा घेतला जातो. औषधोपचार व सल्ला दिला जातो. वैद्यकीय अधिकारी डॉ.संध्या बारगजे, आहारतज्ज्ञ सावित्री कचरे, यमुना गायकवाड, वैभव लोहार, अनिल टाक, किरनकुमार जगताप, शाहेद शेख आदी या विभागात काम करतात.
बालकासह काळजीवाहकालाही सुविधा
बालक एनआरसी विभागात दाखल हाेताच त्याला योग्य त्या औषधोपचारासह आहार दिला जातो. सोबत असलेल्या काळजीवाहकालाही रोज १०० रूपये प्रमाणे १४ दिवस बुडीत मजूरी दिली जाते. तसेच नाश्ता, जेवण, चहाही दिला जातो.
सीएचओंची बैठक, सीडीपीओंशी संवाद
कोरोनाकाळात कमी बालके आली. परंतु आता हे प्रवेश वाढविण्यासाठी सर्वच सीडीपीओंशी संवाद साधण्यात आला. समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सुचना करण्यात आल्या. आता हा आकडा वाढेल, असा विश्वास डॉ.हुबेकर यांनी व्यक्त केला.
कोट - फोटो
कुपोषण कमी करण्यासाठी एनआरसीमार्फत आलेल्या बालकांवर उपचार केले जातात. पालकांनी उपचार व सुविधांबाबत मनात गैरसमज न ठेवता पुढे यावे. आमचा विभाग उपचारासाठी तत्पर आहे. बालके शोधण्यासाठी सीडीपीओंशी संवाद साधण्यासह सीएचओंची बैठक घेतली आहे.
डॉ.संध्या बारगजे, वैद्यकीय अधिकारी एनआरसी बीड
---
वर्षबालके
२०१५-१६ १७५
२०१६-१७ १७५
२०१७-१८ २०९
२०१८-१९ १२०
२०१९-२० १२१
२०२०-२१ ०६