लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कोरोना होऊन गेलेल्या लोकांना इतरही आजार आहेत. त्यांच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांच्यात संभ्रम आहे. परंतु, हे रूग्ण जर भूल देण्यासाठी तंदरूस्त असतील तर २० दिवसानंतर त्यांच्या शस्त्रक्रिया करता येऊ शकतात. ज्यांना अत्यावश्यक आहे जसे की, शस्त्रक्रिया केली तरच ते वाचू शकतात, अशांची शस्त्रक्रिया तत्काळ करू शकतात, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे सामान्यांनी मनातील संभ्रम दूर करून वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला वेळोवेळी घेणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या अनेकांना कोमॉर्बिडीटी व इतर आजार आहेत. अनेकांना शस्त्रक्रियांचीही गरज आहे. परंतु, आपल्याला आताच कोरोना होऊन गेला आहे, आता शस्त्रक्रिया केली तर काही त्रास होईल का? असा प्रश्न त्यांना पडत आहे. हाच धागा पकडून ‘लोकमत’ने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांना संपर्क केला. त्यांनी कोरोनामुक्त झाल्यानंतर २० दिवसांनी शस्त्रक्रिया करण्यास मुभा आहे. परंतु, संबंधित रुग्णाची ऑक्सिजन पातळी, शरीर तंदरूस्त असणे गरजेचे आहे. भूल देण्यासाठी रूग्णाच्या शरिराने प्रतिसाद दिल्यावर शस्त्रक्रिया करण्यास काहीच अडचण नाही. ज्यांना कोरोना झाला आहे अथवा २० दिवस झालेले नाहीत, त्यांच्या शस्त्रक्रियेबाबत त्या - त्या वेळची तपासणी करून शस्त्रक्रिया करू शकतो. शस्त्रक्रिया केली नाही तर त्या रूग्णाच्या जिवाला धोका असेल तर त्याची शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचेही डॉ. साबळे यांनी सांगितले.
हट्ट धरू नका, सर्व तपासण्या करा
काही लोक शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांकडे हट्ट धरतात. परंतु, असे करणे आरोग्यासाठी लाभदायक कमी आणि घातकच जास्त ठरू शकते. आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचना आणि रूग्णाची परिस्थिती पाहूनच शस्त्रक्रियेचा निर्णय घ्यावा लागतो. मुद्दाम कोणी टाळाटाळ करत असेल तर त्याची रितसर तक्रार जिल्हा शल्य चिकित्सकांकडे करता येऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी याबाबतही जागरूक राहावे.
--
कोरोना होऊन गेल्यावर २० दिवसांनी शस्त्रक्रिया करू शकतो. परंतु, त्यासाठी रुग्णाचे शरीर भूल देण्यासाठी तंदुरूस्त असावे. तसेच कोरोनाबाधित अथवा नुकताच मुक्त झालेल्या रूग्णाच्या शस्त्रक्रियेबाबत खूपच गरज असेल (शस्त्रक्रिया केली नाही तर जिवाला धोका होईल) तरच ती करता येऊ शकते. मनातील गैरसमज दूर करून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत.
- डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड