अविनाश मुडेगावकर
अंबाजोगाई : ‘मामा कुठं निघालात? देवदर्शनाला. अहो तुम्ही कोरोना वार्डात ॲडमिट आहात ? मग काय होतंय? मी रोजचं देवदर्शन घेतो,माझा नित्य नियम आहे. मला कोणी अडवत नाही. तुम्हाला दवाखाना सोडून कुठेही जाता येणार? नाही. परत वाॅर्डात चला’, हा संवाद आहे, स्वारातीमधील सुरक्षारक्षक व कोरोना रुग्ण यांच्यातील. येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातून निघून रस्त्यावर आलेल्या या रुग्णाच्या हातात सलाईनसाठी लावलेली कॅप तशीच होती. सुरक्षारक्षकाने सजगता दाखविल्याने उघड झालेला हा प्रकार तेथे उपस्थित असणाऱ्या सर्वांनाच धक्का देणारा होता. कोरोना पॉझिटिव्ह असलेला हा रुग्ण चक्क देवदर्शनासाठी निघाला. मंदिरात जाऊन तो दर्शन घेऊन येईपर्यंत आणखी किती जणांच्या संपर्कात येणार? आणि किती जणांना संसर्ग होणार? याचा विचारही न केलेला बरा. अशी एकंदरीत स्थिती अंबाजोगाईत निर्माण झाली आहे.
होम क्वारंटाईन असलेल्यांच्या बाबतही असाच प्रकार घडत आहे. कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेले, परंतु फारसे गंभीर लक्षणे नसणाऱ्यांना होम क्वारंटाईन केले जात आहे. परंतु, हे रुग्ण पथक फोटो काढेपर्यंत घरात थांबतात. एकदा पथक येऊन गेले की, अनेकजण गावभर फिरून येत असल्याने संसर्गाचा धोका वाढत आहे. हे दोन्ही प्रकार पाहिल्यास प्रशासनाकडून कडक उपाययोजना करणे आवश्यक बनले आहे. नागरिकांनी शहरात फिरताना काळजी घेणेही गरजेचे असल्याचे समोर आले आहे.
चाचणीनंतर प्रशासनाकडून निरोप मिळताच थेट स्वाराती रुग्णालयात पोहोचणाऱ्या संबंधित पॉझिटिव्ह व्यक्तीस कोणीही विचारणा करत नाही. पॉझिटिव्ह व्यक्तीलाच स्वतःहून समोर जे कोणी ब्रदर, सिस्टर, डॉक्टर आहेत त्यांना मी पॉझिटिव्ह आहे, मला ॲडमिट व्हायचे आहे, असे अनेकवेळा सांगावे लागते. तरीही त्या व्यक्तीस बेड शिल्लक नाही. होमक्वारंटाईन होऊ शकता का? भिंतीवर चिटकलेली यादी पहा व गोळ्या घ्या. खूप काही त्रास होत असल्यास बेड मोकळा होईपर्यंत थांबा असे सांगितले जाते. तेथे पॉझिटिव्ह असलेल्या अनेक सामान्य व्यक्ती व महिलासुद्धा ॲडमिट करून घ्या , अशी विनंती करताना दिसतात. संसर्ग झालेल्या या रुग्णांना ताबडतोब रुग्णालयात अथवा कोविड सेंटरमध्ये दाखल करणे आवश्यक असताना यंत्रणेकडून यातही चालढकल केली जाते. अनेकदा हे रुग्ण मिळेल त्या वाहनाने अथवा पायीच सिटीस्कॅन , एक्स - रे साठी फिरत असतात. हा प्रकार संसर्ग वाढवण्यास कारणीभूत ठरत आहे.
नागरिकांनी स्वतःहून कोरोनाची आचारसंहिता पाळणे गरजेचे आहे. पोलीस प्रशासन परिस्थितीशी सामना करण्यासाठी सज्ज आहे. प्रत्येकाने जिम्मेदारीने वागून कोरोना थांबवला पाहिजे. विनाकारण बाहेर फिरू नये. अन्यथा कारवाई करण्यात येईल. -
स्वाती भोर
अपर पोलीस अधीक्षक,अंबाजोगाई.
कोरोनाला रोखणे ही प्रशासनाबरोबरच जनतेची जबाबदारी आहे. नागरिकांना गांभीर्य नाही ही दुर्दैवाची बाब आहे. सध्या कोरोनाची दुसरी लाट आहे. प्रत्येकाने सुरक्षित राहणे ही काळाची गरज आहे. मास्क वापरणे बंधनकारक आहे. दोन दिवसांपूर्वी वीस जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली आहे. -
शरद झाडके
उपजिल्हाधिकारी,अंबाजोगाई.
कोरोनाबाधितांची संख्या सध्या खूप आहे. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये ऑक्सिजन बेडची संख्या वाढवत आहोत. ऑक्सिजन पुरेसा उपलब्ध होतो आहे. संपूर्ण ताकदीनिशी सर्व डॉक्टर्स व रुग्णालयातील कर्मचारी रुग्णांना सर्व सोयी सुविधा पुरवून तातडीने उपचार करत आहोत. कोरोनाबाधित रुग्ण वाॅर्डाच्या बाहेर येणार नाहीत. यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात येतील. - डॉ.शिवाजी सुक्रे
अधिष्ठाता
स्वा.रा.ती.रुग्णालय,अंबाजोगाई.